◾अपघात क्षेत्र असलेल्या भागात उड्डाणपूलाची आवश्यकता; गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबत नसुन रोज एक अपघात याठिकाणी होतो. बोईसर-तारापूर सारखी आणि गुजरात राज्यातील वापी अशा या दोन मोठ्याऔद्योगिक वसाहती असल्यामुळे या मार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने मोठ मोठी वाहने ये-जा करीत असतात. महामार्गा लगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने महामार्ग ओलांडून जाणाऱ्या अनेक नागरीकांनी आपले जिव गमावले आहेत. यामुळे नांदगाव तर्फे दहिसर भागात उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या नांदगाव (जव्हार फाटा), आवंढाणी (बेलपाडा), हालोली (पाडोसपाडा), तवा, चारोटी व मेंढवण खिंड ही गावे असुन या ठिकाणी उड्डाणपुल नसल्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून जनसामान्य माणसाना आपल्या जीवास मुकावे लागत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या मेंढवण, चारोटी, नांदगाव, हालोली व चिल्हार फाटा या ठिकाणी सतत अपघात होतात. या अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वी शांताराम गणेशकर हा इसम महामार्ग पार करत असताना मुंबई मार्गिकेकडून येणाऱ्या भरधाव डस्टर कारने त्याला धडक दिली असता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मागील 4 ते 5 वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपूल असावे. यासाठी प्रशासनाने आयआरबीला पत्र ही दिली आहे. परंतु आजपर्यंत या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची चिन्ह ही दिसत नाहीत.
मनोर तर्फे नांदगाव ग्रामपंचायतीने 2 वर्षापूर्वी आयआरबी कंपनीच्या घोडबंदर येथील कार्यालयामध्ये या बाबत पत्र ही दिले होते. त्याचप्रमाणे गुजरात येथे असलेल्या कार्यालयाला ही पोस्टाने पत्र व्यवहार केला आहे. तर ग्रामपंचायत समितीने खा. राजेंद्र गावित यांना निवेदनसुध्दा दिले आहे. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत सरकारने व आयआरबी कंपनीने दखल न घेतल्यास नांदगांव येथील नागरिकांनी महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
◼राष्ट्रीय महामार्गावर मनोर तर्फे नांदगांव येथे पूर्व-पश्चिम या दोन बाजूला मोठी लोकवस्ती आहे. आणि मनोर ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नेहमीच येथे वर्दळ असते. या ठिकाणाहून अनेक शाळकरी मुले व ग्रामस्थ ये-जा करत असतात. उड्डाणपूल नसल्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. खा. गाविताना उड्डाणपुलासाठी पत्र व्यवहार केला आहे. मात्र अजून याकडे लक्ष दिले नाही. जर उड्डाणपूल झाले नाही तर येणाऱ्या काळात रास्ता रोको करू.
— पवन सवरा, सरपंच, मनोर तर्फे नांदगाव