पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: फक्त महिला दिनाच्या दिवशीच महिलांविषयी कृतज्ञता दाखवून चालणार नाही तर जीवनातील प्रत्येक दिवशी महिला शक्तीचा आदर करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले आहे. वाडा येथे शनिवारी आस्था महिला विकास प्रबोधन संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या महिला कृतज्ञता कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
पालघर जिल्ह्यात शासकीय योजना यापुढे फक्त कागदोपत्री न राबविता त्या योजनांचा फायदा खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचविण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच बाळांतपणासाठी होणारा भरमसाठ खर्च लक्षात घेता. जिजाऊ संस्थेच्यावतीने अल्प मोबदल्यात बाळंतपण करण्याची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासनही निलेश सांबरे यांनी दिले. या कार्यक्रमावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य नरेश आकरे, शशिकांत पाटील, रोहिणी शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.