◾ पुजा केमिकलचा प्रसाद कोणाकोणाच्या घश्यात; सहा महिन्यापूर्वी घडलेल्या प्रकाराचा पुराव्यानिशी उलगडा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल माफिया व बोईसर पोलीस यांचे कनेक्शन काही नवीन नाही. असाच काही प्रकार पुन्हा उघडकीस आला असून एका कारखान्यातुन सहा महिन्यापूर्वी घातक रासायनिक घनकचरा घेवुन जाणारे वाहन बोईसर पोलिसांनी तडजोड करून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बोईसर पोलिस ठाण्याचा केमिकल माफियांचा मुखवटा पुन्हा एकदा समोर आल्याने याबाबत पोलीस अधीक्षक आता तरी केमिकल माफियांच्या संपर्कात असलेल्या पोलिसांची चौकशी करतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातुन पुजा केमिकल या कारखान्यातील घातक रासायनिक घनकचरा 25 फेब्रुवारी 2020 रोजी बेकायदेशीर पणे घेवुन जात असताना बोईसर पोलिसांनी दुपारच्या वेळेस वाहन ताब्यात घेतले होते. वाहन क्रमांक एम एच 48, बीएम 3651 या वाहनात मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचरा होता. हे वाहन बोईसर पोलीस ठाण्याच्या बाजूला बंद अवस्थेत असलेल्या पोलीस वसाहतीच्या रस्त्यावर लपवून ठेवण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पासून हे वाहन रात्री उशिरापर्यंत याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रासायनिक घनकचरा असलेल्या वाहनावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करताच वाहन रात्री उशिरा झालेल्या तडजोडी नुसार सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातच या वाहनाची कोणत्याही प्रकारची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेली नाही.
बोईसर पोलिसांनी सोडून दिलेल्या वाहनांची माहिती गेल्या दोन महिन्यापासून पालघर दर्पणच्या विशेष सुत्रांकडून मिळाली होती. मात्र याबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पालघर दर्पणची टीम काम करत असताना याबाबत खात्रीशीर पुराव्यानिशी या घटनेचा उलगडा झाला आहे. वाहन बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची स्टेशन डायरी वर नोंद घेतली होती का, यावेळी बोईसर पोलिस व तडजोड करणाऱ्या लोकांनी एकमेकांन मध्ये केलेले संभाषण याची संपूर्ण चौकशी झाल्यास लाखो रूपयांची तडजोड बाहेर येण्याची शक्यता आहे. बोईसर पोलीस ठाणे मध्ये होणाऱ्या गैरप्रकार बाबत अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांन कडे तक्रारी केल्या असताना देखील साधी चौकशी देखील केली जात नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रातून निघणाऱ्या सोन्याच्या धुरावर अनेक अधिकारी आपले हात शेकून घेत असल्याने या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची गरज आहे.
◾ मोठ्या साहेबांनी मागीतले 6 लाख 50 हजार?
वाहन सोडून देण्यासाठी कारखाना मालका कडे मोठ्या साहेबांना देण्यासाठी 6 लाख 50 हजार व काही लोकांन साठी 2 लाख 50 असे एकूण 9 लाख रूपये उकळले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत कारखान्यातील एक जबाबदार व्यक्तीने संभाषण केलेला अँडिओ पालघर दर्पणच्या हाती लागल्याने हा मोठा उलगडा झाला आहे. या अँडिओ मध्ये अतिशय आर्थिक चणचणीत असलेला हा संबंधित व्यक्ती त्रस्त झालेला असल्याचे त्याच्या बोलण्या वरून दिसून येत आहे.