पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर भिमनगर येथे रस्त्याच्या मध्य भागी शुक्रवारी सकाळी सुरू असलेली विद्युत तार तुटून पडली होती. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी तासनतास पडलेल्या विद्युत तारेकडे महाराष्ट्र विज वितरण मंडळाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून नागरिकांनी तक्रार केल्यानंतर उशिरा विद्युत तार हटविण्यात आली.
बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने हा रस्ता गजबजलेला असतो. शुक्रवारी सकाळी रस्त्याच्या दुतर्फा गेलेल्या विद्युत वाहिनीवरून एक तार तुटून पडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच खबरदारी घेत तारेचा धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या भागात टायर ठेवुन अटकाव केल्याने कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. यातच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत तारा जिर्ण झाल्या असताना देखील त्यांच्या दुरुस्ती कडे व त्या बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात झाल्यास मोठी हानी उद्भवू शकते. भिमनगर याठिकाणी पडलेली विद्युत तार नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला केली असून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.