◾ विक्रमगड तालुक्यातील टेटवाली येथील बचतगटाकडे एक हजार पर्यावरण पूरक आकाशकंदीलाची मागणी
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: विक्रमगड तालुक्याची ओळख म्हणजे आदिवशी तालुका. रोजगाराचे साधन नसल्याने पोटापाण्यासाठी पाठीवर ओझे घेऊन स्थलांतर करणारी कुटुंब. मात्र मागील काही वर्षात येथील स्थलांतराचे प्रमाण कमी झालेय. कारण फक्त भात शेतीवर अवलंबून न राहता येथील आदिवशी शेतकऱ्यांनी मोगरा,गुलाबाबरोबर भाजीपाला लागवड करत स्वतःनेच रोजगाराची निर्मिती केली तरीही काही भागात रोजगारासाठी स्थलांतर होतच होते मात्र तेथील महिला एकत्र येऊन त्यावदेखील उपाय काढत बांबू पासून विविध शोभेच्या वस्तू बनवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून हे स्थलांतर थांबविण्याचे काम करत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील टेटवाली या गावातील महिलांनी बचतगट स्थापन करून केशवसृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी एक महिना गावातच बांबू पासून बनविलेल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कलेचे प्रशिक्षण घेतले आहे. आधीच बांबूपासून टोपले,सूप आणि इतर गोष्टींच्या विणकामाची कला अंगभूत असलेल्या या महिलांच्या कलेला या प्रशिक्षणामुळे अधिकच धार आली आहे. या प्रशिक्षणानंतर त्यांनी बांबूपासून विविध आकर्षक वस्तू बनविण्यास सुरवात केली आहे.यामध्ये त्यांनी आकर्षक मोबाईल साऊंड स्टँड, रिक्षा, चहा तसेच पाण्यासाठीचे ट्रे ,हळद-कुंकू ठेण्यासाठी करंडे ,पेपर वेट, विविध प्रकारच्या ट्रॉफी अशा अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे या वस्तूंची मागणी घटली आहे. मात्र केशवसृष्टी संस्थेच्या माध्यमातून टेटवाली या गावातील या बचत गटाकडे एक हजार आकाश कंदीलाची मागणी आली असून बांबू व कपडा यापासून हे सुरेख आकाशकंदील बनविले जात आहे.विक्रमगड भागातील या बचतगटाबरोबरच इतर आणखी 7 ठिकाणी असे जवळपास 4 ते 5 हजार आकाशकंदील बनविले जात आहेत
टेटववाली येथील या बचत गटाला एक हजार आकाश कंदील बनविण्यासाठी जवळपास एक महिना लागणार असून एका आकाश कंदीलांची किंमत 350 ते 400 रुपये मिळणार आहे. या आकाश कंदीलासाठी लागणारे बांबू गावताच मिळत असून एका बांबूसाठी त्यांना 40 रुपये मोजावे लागतात. भविष्यातील बांबूच्या मागणीचा विचार करता या बचतगटाच्या माध्यमातूनगावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. टेटवाली गावातील या सर्व महिला आणि त्यांना सहकार्य करणारे पुरुष हे वीटभट्टी ,रेती काढण्यासाठी स्थलांतर करत असत तर काहीजण नका कामगार म्हणून रोजगारासाठी. भटकंती करत असत.यामुळे या कामगारांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असे. मात्र त्यांनी आपल्या अंगभूत कलेला प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिक रूप दिल्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य बदलले असून या कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला देखील स्थेर्य देण्याचे काम करून पर्यावरणाची होणारी हानी देखील थांबवत आहेत.
◾केशवसृष्टीने आमच्यातील कलागुण ओळखून आम्हाला नवीन दिशा दाखवली असून आमच्या वस्तुंना बाजारपेठ निर्माण करून आम्हाला हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात आम्ही अतिशय मोठ्या स्वरूपात या वस्तूंचे उत्पादन करणार असून यांत्रिकीकरणाचा देखील यात वापर करण्याचा विचार करीत आहोत.
—- नमिता नामदेव भुरकुड
अध्यक्षा, महिला समूह
◾ गणेशोत्सव संपला की दसरा येतो आणि दसरा संपल्यावर वेध लागतात ते दिवाळी सणाचे. कधी काळी अत्यंत साधेपणाने साजरा होणारा हा उत्सव आज व्यवसाय आणि बाजारपेठांचे प्रमुख साधन बनला आहे.परंपरा त्याच असल्या तरी त्या साजऱ्या करताना त्यात आधुनिकतेच्या नावाखाली विविध वस्तूंचा वापर सुरू झाला.त्यात महत्वाचे आकर्षण बनले ते आकाश कंदील.घरोघरी या सुबक आकाश कंदिलांचा वापर होऊ लागल्याने आकाश कंदीलांसाठी देशात मोठे मार्केट तयार झाले मात्र याचा फायदा उचला तो चिनी आकाश कंदिलांनी. मात्र ग्रामीण भागातील पर्यावरण पूरक अशा बांबूच्या माध्यमातून बनविलेल्या आकर्षक आकाश कंदील या चिनी आकाश कंदीलांशी दोन हात करू शकतात. यासाठी शासनाने देखील पुढाकार घेतल्यास विक्रमगडसारख्या आदिवशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन होणारे स्थलांतर आणि त्यामुळे वाढणारे कुपोषण थांबू शकते.