◾पालघर शहराचे गटार पाणेरीत विसर्जित; अनेक वर्षांपासून पाणेरी प्रदुषणाचा प्रश्न प्रलंबितच
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: माहीम-वडराई येथील ग्रामस्थांच्या पाणेरी बचाव संघर्ष समितीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पालघर बिडको औद्योगिक वसाहती लगत पानेरीचे दूषित पाणी मातीचा मोठा बांध घालून अडविले होते. मात्र नैसर्गिक स्त्रोत कोणीही अडवू शकत नाही, असे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर आणि पालघर नागरी कृती समितीने हरकत नोंदविल्यानंतर पालघर नगरपरिषदेने कारवाई करत हा बांध जेसीबीच्या साह्याने तोडून पानेरीचा प्रदुषणकारी प्रवाह पुर्ववत केला आहे.
पानेरी हा शब्द ऐकणे आता नवीन राहिलेला नसुन माहीम-वडराई गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत पानेरी बचाव संघर्ष समितीमार्फत गेली अनेक वर्षे पानेरीच्या शुद्धीकरणासाठी लढा देत आहेत. मात्र प्रशासन याकडे पूर्णतः कानाडोळा करत असल्याने कोणताही ठोस निर्णय आजपर्यंत अनेक आंदोलने करूनही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पानेरी बचाव संघर्ष समितीच्या आजपर्यंतच्या लढ्यांना व आंदोलनांना हवे तेवढे यश मिळताना दिसून येत नाही. वडराई गावाजवळ समुद्रास मिळणाऱ्या या नदीची आजची स्थिती भयावह असून पूर्णतः प्रदूषित झाली आहे. या प्रदूषणातून पानेरीला पुनर्जीवन मिळावे. ती पुन्हा शुद्ध होऊन वाहावी हाच ध्यास ठेवून आणि शासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी संघर्ष समितीने पानेरीचे दूषित पाणी मातीचा मोठा बांध घालून अडविले होते. यामुळे पालघर शहरातील सांडपाणी बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होऊन जागोजागी साचू लागल्याने शहरातील गटारांचे सांडपाणी इमारतीच्या कूपनलिकेमध्ये शिरु लागले होते.
पानेरी बचाव संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाची दखल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यानुसार जानेवारी २०१९ ला आंदोलनकर्त्यांची एक बैठक बोलाविण्यात येऊन यावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा घडवून आणली होती. यामध्ये पानेरी प्रदूषणाचे मूळ कारण शोधण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बिडको व माहीम परिसरातील एकूण ४६ रासायनिक उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले होते. आणि या सर्वेक्षणाचा अहवाल या समितीला १५ जानेवारी २०१९ ला देण्याचे आदेश पालघर उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी दिले होते मात्र आजुनही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
◾ २७ मार्च २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ व जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंग यांनी पानेरी नदीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्याना पानेरीची स्थिती अत्यंत खराब असून होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय समजायला हवा. कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगडित असून नदी आजारी पडल्यास आपण ही आजारी पडतो असे त्यांनी सांगितले होते.