◾ भरधाव वेगाने आलेल्या दुध गाडीने चारचाकी वाहनाला दिली जोरदार धडक; चारचाकी मधील तिन लोक जखमी
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: भरधाव वेगाने वाहने चालत असलेल्या बोईसर चिल्हार रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून तिन लोक यामध्ये जखमी झाले आहेत. दुध वाहतूक करणारा ट्रक व चारचाकी वाहना मध्ये हा अपघात घडला या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
बोईसर चिल्हार रस्त्यावर सोमवारी 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुरत वरून बोईसर मध्ये आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी येणाऱ्या एका वँगेनार कार मध्ये चार प्रवासी प्रवास करून बोईसरच्या दिशेने येत होते. मात्र याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अमुल दुध वाहतूक ट्रकने चरी वेळगाव भागात कारचाकीला समोरून साधारण 12:00 वाजताच्या नंतर जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुध गाडीचे पुढचे दोन्ही टायर तुटून मागे आले होते. चारचाकी वाहनाचा पुढचा भाग चुरा झाला असून यातील वाहन चालकाला मोठी दुखापत झाली होती. वाहनात सुखरूप असलेल्या एका व्यक्तीने स्थानिकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले होते. परंतु त्यांना उपचारासाठी कोणतेही वाहन थांबत नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. याच दरम्यान बोईसर हुन चिल्हार कडे चाललेल्या तिन पत्रकारांना जखमी असलेल्या तिघांना आपल्या कार मध्ये बसवून बोईसर साधारण 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोईसर येथील तुंगा हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी तातडीने दाखल केले.
वाहनाचा अपघात झाल्यानंतर दुध गाडीचा चालक हा त्या ठिकाणाहून फरार झाला. चारचाकी वाहनातील अनिल टाना (66) कांदिवली, निखिल राय चुरा (60)अंधेरी, देवेंद्र राय चुरा (73) बोईसर मान टाटा हाउसिंग हे जखमी झाले होते. यातील देवेंद्र चुरा या दिव्यांग असलेल्या वयवृध्दांचा पाय टुटला असून इतरांना देखील दुखापत झाली आहे. जखमींवर उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अपघात झाल्या नंतर साधारण दोन तासानंतर मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताची नोंद मनोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
◾ पोलीस नाँटरिचेबल
अपघात झाल्या पासून याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व पत्रकारांनी मनोर पोलीस ठाण्यात व अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकानेही प्रतिसाद दिला नाही. तर पोलीस अधिकाऱ्यांचे दुरध्वनी बंद आले होते. यानंतर पालघर पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.