पालघर दर्पण: वार्ताहर
डहाणू: डहाणू नगरपरिषदेत अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीत गैरव्यवहार सुरू असून अनधिकृतपणे बेकायदा दुसरा मजला बांधून हे गाळे अनावधानाने घेणार्या गरजू लोकांची मोठी फसवणूक विकासक करीत असल्याची बाब समोर आली आहे. या बेकायदा बांधकामांकडे डहाणू नगरपरिषदेचे बांधकाम खाते हेतूपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याची शक्यता आहे.
डहाणू मौजे लोणीपाडा येथे गट नंबर.73/1 येथे डहाणू नगरपालिकेने तळमजला व पहिला मजला असे कमी उत्पन्न गटासाठी बैठ्या चाळीसाठी 1323.64 चौ मी बांधकाम परवानगी विकास नागरदास भुत्ता यांना नगरपरिषदेने 04 एप्रिल 2007 रोजी दिली होती .परंतु त्या बैठ्या चाळीवर त्यांचे अधिकृत कुलमुखत्यार पत्र धारक गणेश डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेच्या भागीदारांनी वापरून अनधिकृतपणे बेकायदा दुसरा मजला बांधल्याचे दिसत आहे.
नगरपरिषदेत सत्तेत असणाऱ्या काही मंडळींच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याची कुजबुज लोकांमध्ये आहे.या प्रकरणी नगरपालिका बांधकाम खाते यांनी दखल घेऊन हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी जोर धरत आहे.तसेच या इमारतीला पुरविले जाणारे पाणी व वीज जोडणी तोडून कायदेशीर कारवाई करवी अशी येथील जनतेची मागणी आहे.
◼परवानगी पेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम केल्याने लोणीपाडा येथील विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
— किरण राऊत, अनुरेखक बांधकाम विभाग डहाणू नगरपालिका