◾ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे साडे आठ लाखांची विदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत दोन आरोपींसह सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला माल विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावातील दारू तस्कराचा असल्याची माहिती पुढे येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तलासरी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरून एका पीक अप टेम्पोतून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी महामार्गावर सापळा रचला होता. केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हवेली भागातून दारू भरून निघालेला पीक अप टेम्पोला महामार्गावरील महालक्ष्मी मंदिराजवळच्या चौकात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबण्याचा इशारा दिला होता. परंतु टेम्पो चालकाने मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात टेम्पो पळवायला सुरुवात केल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टेम्पोचा पाठलाग सुरू केला होता. दरम्यान चारोटी टोल नाक्याच्या पहिल्या मार्गिकेत टेम्पो अडविल्यानंतर टेम्पोची तपासणी करण्यात आली. टेम्पोत विदेशी बनावटीची दारू आढळून आली. टेम्पोसह साडे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रामदास भोपी आणि अनिकेत पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तलासरी तपासणी नाक्यावरील निरीक्षक तुळशीराम कुरडकर, दुय्यम निरीक्षक के बी धिंदळे,जवान सागर तडवी, संतोष पवार आणि वाय एस हरपाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.