◾ नांदगाव समुद्र किनाऱ्यावर मनसेचे प्रतिकात्मक आंदोलन
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: सागरी किनारा व्यवस्थापन CRZ संबधीची जनसुनावणी 30 सप्टेंबरला ऑनलाईन घेण्याचे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. या जनसुनावणीला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांकडून नांदगाव समुद्र किनाऱ्यावर ऑनलाइन सुनावणी विरोधात आंदोलन करण्यात आले.
पालघर तालुक्यातील नांदगाव समुद्र किनाऱ्यावर या ऑनलाइन जनसुनावणीच्या विरोधात शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे साठ हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी होण्याचा अंदाज असलेली जनसुनावणी तांत्रिक अडचणींमुळे होणे शक्य नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप धीरज गावड यांनी केला. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही दिला. येत्या काही दिवसांत गावोगावी जनजागृती करून मोठे आंदोल उभे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. आंदोलनात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे, मनसे विद्यार्थी सेना पालघर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष धिरज गावड आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.