◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील धक्कादायक प्रकार उघड; जखमी कामगारांची माहिती तडजोड करून स्थानिक पोलिस ठाण्यात दिली जात नसल्याचे सत्य उघड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखांन्यात रोजच काही ना काही अपघात होत असले तरी याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात दिली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कारखानदार व काही निवडक रुग्णालय याबाबत संगनमत करून प्रकरणे बाहेरच्या बाहेर मार्गी असल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका कारखान्यात कामगारांची बोटे गेली असताना देखील हा प्रकार लपवून ठेवण्यात आला चे समोर आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात साधारणपणे 1250 पेक्षा अधिक कारखाने सुरू असून यामध्ये औषध निर्मिती, रासायनिक, कपडा उद्योग व सर्वात जात अपघात होत असलेल्या स्ट्रील उद्योगाचा समावेश आहे. कारखान्यात कधी अकुशल कामगाराला इतर कुशल कामगारांचे काम दिल्यावर कामगारांंच्या चुकिने किंवा कधी कारखानदारांच्या हलगर्जीपणा मुळे लहान मोठे अपघात होतात. मात्र अपघात कामगारांचा हात जाणे, हाताची बोटे जाणे, हात कापणे तसेच इतर इजा झाल्यावर कारखानदार हे या कामगरांवर तुटपुंजे उपचार करून कवडीमोल रक्कम देवून वाऱ्यावर सोडून देत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. हे कारखानदार बोईसर भागातील अनेक रुग्णालया सोबत करार करून त्यांच्या कडे कामगारांना उपचारासाठी दाखल करतात. मात्र कारखानदार कायदेशीर प्रक्रिये पासून वाचण्यासाठी येथील कारखानदार व खाजगी रुग्णालये तडजोड करून अपघाताची कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना देत नाहीत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी तारापूर औद्योगिक क्षेत्रात उघडकीस आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील करमतारा इंजिनिअरिंग या स्ट्रील उद्योग कारखान्यात काम करणाऱ्या अकबर जलाद सय्यद ह्या 19 वर्षीय कंत्राटी कामगाराचा 20 मे 2020 रोजी मशिनमध्ये हात अडकल्याने झालेल्या अपघातात उजव्या हाताची 5 बोटे निकामी झाली होती. अकबरला केवळ 5 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याची बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर अकबर त्याच्या विधवा आईसह न्यायासाठी बोईसरच्या कामगार उपायुक्त कार्यालयात फेऱ्या मारत राहिला होता. माध्यमांनी याबाबत विषय घेतल्या नंतर अकबर सय्यद या कामगराला नऊ लाख रूपयाची मदत तातडीने करण्यात आली होती. मात्र कारखान्यातील अपघात लपविण्याऱ्या कारखानदारावर व रुग्णालयावर कोणत्याही प्रकारची कारवाई आजतागायत केलेली नाही. हा कंत्राटी कामगार हा अकुशल असताना देखील त्याला कुशल कामगरांचे काम देण्यात आले होते. याबाबत कामगार उपायुक्त किशोर दहिफळे यांना विचारणा केली असता त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन विषय मारून नेण्याचा प्रयत्न केला होता.
औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. एच 1 मधील लविनो कपूर कॉटन्स या कारखान्यात परवेश दर्शन या कंत्राटी कामगाराचा हात मशिन मध्ये गेल्याने हात निकामी झाला आहे. 8 डिसेंबर 2019 रोजी तो कामावर गेला असता कापूस हाताळणाऱ्या मशिनमध्ये त्याचा हात गेला व हाताला गंभीर इजा झाली होती. बोईसर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. 9 महिन्यापूर्वी घडलेल्या अपघातामुळे कामगाराच्या हाताच्या हालचाली होत नसून त्यासाठी आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून मदत देखील दिली गेलेली नाही. रोजगार नसल्याने या कामगरांची परिस्थिती बिकट असून परवेश दर्शन हा बोईसर भिमनगर भागात आपल्या विधवा आई व बहिणीसह राहतो. कारखान्यातर्फे त्याला पगार दिला जात नसून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे कारखान्यातील अपघात लपविण्याऱ्या उद्योजकांवर व खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
◾ कामगारांच्या हाताला झालेली दुखापत व त्यांची माहिती लपवून ठेवलेले कारखानदार यांच्या वर काय कारवाई केली याबाबत औद्योगिक सुरक्षा विभाग व आरोग्य संचालनालयाचे संचालक अशोक खोत यांना संपर्क साधला असता त्यांनी एक तासात माहिती देतो असे सांगितले मात्र त्यानंतर त्यांना संदेश व वारंवार दुरध्वनी करून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.