◾ हेमेंद्र पाटील
पालघर तालुक्यात भुमाफियांनी घातलेला हैदोस हा फक्त महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तडजोडीने असून या भुमाफियांनी सरकारी जागा देखील गिलंकृत केल्या आहेत. असे प्रकार तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या लगत असलेल्या सरावली भागात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत असून येथील सरकारी जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामाला महसूल विभागाचा पाठिंबा आहे. हो हे ठाम पणे सांगु शकतो कारण येथील स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने येथील सरकारी जागेवर इमारतींची बांधकामे उभी राहत आहेत.
सरावली अवधनगर याभागात सरकारी जागेवर आजवर हजारो बांधकामे उभी राहिलेली असून याला स्थानिक स्वराज्य संस्थे बरोबरच महसूल विभागाचा आर्शिवाद आहे. कारण अशा बांधकामांचे मोजमाप व नोटीस बजावल्यावर लाखो रूपयांची तडजोड होत असून अधिकार्यांना पण अच्छे दिन यायला सुरूवात झाली आहे. मग तहसीलदार यांच्या कडे कारवाई साठी अहवाल पाठवला आहे हे सांगुन सुरू असलेल्या बांधकामाकडे दुर्लक्ष करायचे आणि आपला खिसा गरम करून घ्यायचा हीच प्रथा बोईसर भागात सुरू आहे. सरावली भागातील सुमारे 250 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई चे प्रस्ताव पाठवले असून यामध्ये सरकारी जागेवर उभी राहिलेले भंगार गोडाऊन यांचा देखील समावेश आहे. तहसीलदार यांच्या कडे कारवाई बाबत प्रस्ताव पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात येत असले तरी वास्तविक अहवाल येईल तिथ पर्यंत अनधिकृत बांधकामे उभी राहून पुर्ण होत असल्याने अशा अनधिकृत बांधकामांना फक्त नोटीस पाठविण्याचा दिखावा केला जातो. यातच तहसीलदार यांच्या कडे अहवाल पाठवून बांधकामे मात्र तडजोडीने सुरूच ठेवली जात असल्याचे बोईसर भागात दिसून येते.
बोईसरचे महसूल विभागाचे अधिकारी एखाद्या बांधकामावर कारवाई करताना तहसीलदार यांच्या आदेशाची वाट पाहत नाही. कारण तिथून त्यांचा खिसा गरम झालेला नसावा हेच कारण असावे. अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवून महसूल अधिकारी त्याठिकाणी पुन्हा फिरकत नाहीत. कारण एकदा नोटीस पाठवली मग कारवाईच्या भितीने काही भुमाफिया तडजोड करण्यासाठी येतात. यातच याठिकाणी सरकारी जागेवर एक हाँटेल देखील उभे राहिले असताना देखील दोन वर्षे होऊन देखील तहसीलदार यांचे आजवर आदेश आलेले नाही. या कार्यकाळात दोन तहसीलदार आले यामुळे हाँटेल ची बिर्याणी कोणकोणत्या अधिकार्यांनी खाली हा मोठा प्रश्न आहे. येथील महसूल विभागाचे अधिकारी म्हणजे वसूली केंद्र म्हणूनच काम करत असल्याचे आता बोलणे उचित ठरत आहे.