पर्यटकांकडून सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याच्या सूचनांचे उल्लंघन
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश धुडकावून शेकडो पर्यटकांनी रविवारी वांद्री धरणावर हजेरी लावली होती. विना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन न करता शेकडो पर्यटक धरण परिसरात फिरत असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.
पावसाळ्यात धबधबे, तलाव, धरणे, किल्ले आणि समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.त्यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता असते. तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पर्यटकांना धबधबे, तलाव, धरणे, किल्ले आणि समुद्र किनारी जाण्यासाठी मनाई आदेश जारी केले आहेत. रविवारी 13 सप्टेंबर वांद्री धरण आणि ओव्हरफ्लोच्या ठिकाणी विना मास्क शेकडो पर्यटक आले होते. ठिकठिकाणी मद्यपार्ट्या सुरू होत्या, तर पर्यटकांकडून सामाजिक अंतराचे नियमांचे उल्लंघन करून ओव्हरफ्लोच्या पाण्यात डुंबत असल्याचे चित्र धरण परिसरात होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश धुडकावणाऱ्या पर्यटकांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे.