◾ वाडा तालुक्यातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थे विरोधात स्वाभिमान संघटने दिला होता उपोषणाचा इशारा
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांसह वाडा- भिवंडी महामार्गाची चाळण झाली आहे. याकडे लक्ष देत या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी स्वाभिमान संघटनेने केली होती. तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील दिला होता याची दखल घेत वाडा तहसीलदार डॉ.उद्धव कदम आणि पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि यासंदर्भात असलेल्या इतर खात्याच्या अधिकाऱ्यांशी आणि स्वाभिमान संघटनेचे जिल्हा प्रमुख जितेश पाटील, वाडा तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे तसेच स्वाभिमान संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत त्यांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन देत हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
स्वाभिमान संघटनेने मागणी केलेल्या बुधावली येथील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला सुरवात केली आहे. त्याच बरोबर महत्वाचा मार्ग असलेल्या वाडा-भिवंडी मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात झाली असून पाऊस थांबताच दोन दिवसात डांबरी करणाचे काम चालु होईल असे आश्वासन देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर कुडूस- कोंढले रस्त्याचे व सापरोंडे फाटा- उचाट तसेच डाकिवली फाटा ते चांबळे रस्त्याच्या डागडूजीला सुरवात केली असल्याने व ते वेळेत पुर्ण करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. त्याच बरोबर वाडा तहसीलदार आणि वाडा पोलीस निरीक्षक यांनी तालुक्यात जनता कर्फ्यू लागू असून आंदोलनाने शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून केलेल्या विनंती नंतर स्वाभिमान संघटनेच्या वतीने हे उपोषण स्थगित केले असून जर ही कामे वेळेत झाली नाहीत तर पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी बांधकाम विभागाच्या दिला आहे.