◾ पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली भूकंपग्रस्त भागाची पाहणी
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त भागाला तातडीने मदत करण्यात येईल.तसेच भूकंपाच्या तीव्रतेचा परिणाम कमी करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊन उपाययोजना करण्यात येतील आणि भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरे तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. सोमवारी ते डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.
पालकमंत्री दादा भुसे सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी गावात जाऊन पालकमंत्र्यांनी भूकंप ग्रस्त घरांची पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून भूकंपग्रस्त भागाचा पाहणी अहवाल तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. तसेच शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
धुंदलवाडीच्या वेदांता हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर येथे भेट देऊन तेथे दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली.जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात सर्वांनी आपल्या गावाकडे आपले कुटुंब म्हणून पाहिले पाहिजे,व आपली जबाबदारी समजून सर्वांची काळजी घेतली पाहिजे. या योजनेत अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करून सदस्यांची तपासणी करून घ्यायची आहे.ही तपासणी कोव्हीड पुरती मर्यादित न राहता कुठलेही आजाराचे निदान यातून करता येणार आहे. व त्यातून सुदृढ नागरिक निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी भूकंपामागील शास्त्रीय कारण प्रशासनाने शोधून काढण्याची गरज व्यक्त केली. भूकंपग्रस्त भागात निवारा स्थळ बनवण्याची मागणी आमदार सुनील भूसारा यांनी केली. तसेच शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यामुळे गम्भीर परिस्थिती उदभवू शकते अशी शक्यता व्यक्त केली.आमदार श्रीनिवास वणगा यांनी भूकंपाचा धक्का बसल्यानंतर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन,उपविभागीय अधिकारी अशीमा मित्तल उपस्थित होते.