प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व आपण जाणून घेऊया.
पितृपक्षातील अमावस्येला हे ‘सर्वपित्री अमावस्या’ हे नाव आहे. या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास, या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. शास्त्रात सांगितले आहे की, श्राद्धासाठी अमावस्येची तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे.
सर्वपित्री अमावास्येला घरातील किमान एक तरी ब्राह्मणला भोजनाचे निमंत्रण दिले जाते. या दिवशी मच्छिमार, ठाकूर, बुनकर, कुणबी आदी जातींतील पितरांच्या नावाने भाताचा अथवा पिठाचा पिंड दिला जातो आणि आपल्याच जातीतील काही लोकांना भोजन दिले जाते. यामध्ये या दिवशी ब्राह्मणांना शिधा (अन्न सामुग्री) देण्याची परंपराही प्रचलित आहे. – संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्ध’
शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सुतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.
पितृपक्षात जर सुतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो, जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करु शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडिल यांपैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करु शकतो. – वेदमूर्ती केतन शहाणे, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
टीप : यावर्षी ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर पितृपक्षात सर्वपित्री अमावास्येलाही शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करणे शक्य नसल्यास पितृपक्षानंतर अधिक मास येत असल्याने त्या काळात म्हणजे 18.9.2020 ते 16.10.2020 या काळात श्राद्ध करू नये. त्यानंतर महालय समाप्तीपर्यंत म्हणजे 17.10.2020 ते 15.11.2020 या काळात श्राद्ध करता येईल. कोरोना महामारीमुळे सद्य:स्थितीत पालट होऊन ती पूर्वपदावर आल्यास विधीपूर्वक पिंडदान करून श्राद्ध करावे.
कलियुगात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच आध्यात्मिक त्रास असल्याने, श्राद्ध करण्याच्या जोडीला सर्वपित्री अमावस्येच्या तिथीलाही ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अधिकाधिक करावा.
सौजन्य : सनातन संस्था
संपर्क : 9920015949