◾ गाळ काढण्याच्या नावाखाली दिला बोगस रेती वाहतुकीचा परवाना; जिल्हाधिकारी कार्यालयातुन देण्यात आलेल्या परवान्यावर प्रश्नचिन्ह
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: अरबी समुद्र किनाऱ्यावर वाळू माफियांनी हैदोस घातला असून याला महसूल विभागाने देखील साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी काही भागात खाडीतील गाळ काढण्याच्या नावाखाली रेती वाहतूक परवाना दिला असून रेतीच्या परवाना वर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वाळूची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र तरीही स्थानिक महसूल विभागाचे तलाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
पालघर जिल्ह्याला सुंदर समुद्र किनारा लाभला असला तरी जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हा समुद्र किनारा विद्रूप होण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण देखील तसेच असून नियमांना बगल देवुन खाडीतील गाळ काढण्याच्या नावाखाली दिली जाणाऱ्या राँयल्टी वर वाळू माफिया येथील वाळूची तस्करी करून ही वाळू महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर नेण्यात येते. जिल्हा खनिकर्म विभागाकडून याअगोदर देखील मुरबे याठिकाणी बेकायदेशीर पणे नियमांना बगल देवून दिलेला रेती उत्खननाचा परवाना याबाबत पालघर दर्पणने वृत्त प्रसिद्ध करून त्यांचा पाठपुरावा केला होता. विषय उजेडात आणल्यावर स्वतः ला वाचवण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने तातडीने परवाना रद्द केला होता. परंतु असाच प्रकार पुन्हा उजेडात आला असून खारेकुरण येथील दिपक भोईर यांच्या नावाने रेती उत्खनन म्हणजेच खाडीतील गाळ काढण्यासाठी परवाना देण्यात आला असून दुध नदीच्या मुखापासून ते सातपाटी बंदर गट क्र. 7 याबाबत 100 ब्रास रेतीची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. 1 सप्टेंबर 2020 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत असलेल्या परवानगी च्या आधारे येथील वाळू माफियांनी किनाऱ्यावर असलेल्या वाळूची तस्करी व येथील परवाना इतर ठिकाणी वापरण्याचे काम खुलेआम पणे जोमाने सुरू केले आहे.
पालघर तालुक्यातील खारेकुरण भागात दिलेल्या रेती वाहतूक राँयल्टीच्या आधारे मुरबे याभागातुन देखील वाळूची तस्करी केली जात आहे. बुधवारी 16 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रक मध्ये वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली होती. यानुसार बोईसर बेटेगाव पोलीस चौकीवर असलेल्या एका पोलिस शिपाई यांच्या मार्फत खैरापाडा भागातील जहांगीर रोड याठिकाणी दोन मालवाहू ट्रक मध्ये वाळूचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे वाहनांची तपासणी पोलिसांनी केली त्यावेळी वाळूच्या वरच्या भागावर प्लॅस्टिक ड्रम ठेवून ट्रक झाकला जात होता. त्यानंतर तासभराने आलेल्या ट्रक मालकांने पोलिसांना राँयल्टी दाखवून बेकायदेशीर असलेली वाळूची तस्करी कायदेशीर दाखवून वाळू माफिया प्रसार झाले. महत्त्वाचे म्हणजे बोगस परवाना दाखवून केलेल्या जाणाऱ्या वाळूच्या तस्करी बाबत पालघर तहसीलदार सुनिल शिंदे यांना वारंवार संपर्क साधल्यानंतर त्यांनी बोईसर येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाण्यासाठी सांगितले होते. मात्र याठिकाणी एकही महसूल विभागाचा अधिकारी फिरकला नसल्याने वाळू तस्करी करणाऱ्या माफियांना महसूल विभागा पाठिंबा असल्याचा आरोप तक्रारदारांन कडून केला जात आहे.
◾वाळू माफियांचा धुमाकूळ स्थानिक तलाठी करतात करी काय?
मुरबे, खारेकुरण याभागात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून येथील स्थानिक तलाठी याठिकाणी कधीही लक्ष देत नाही. तलाठ्यांन कडून याभागात वाळू माफियांवर एकदाही कारवाई केली जात हे विशेष आहे. असे असले तरी अशा तलाठ्यांना त्यांच्या वरिष्ठांन कडून देखील मोकळीक मिळत असल्याचा आरोप नागरिकांन कडून करण्यात येत आहे.
◾ रेती परवाना वर वाळुची तस्करी केली जाते याबाबत व दिलेल्या नियमबाह्य परवाना विषयी विचारणा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी अनिल कांबळे यांना वारंवार संपर्क साधुन व संदेश पाठवून सुध्दा त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
◾रेतीच्या परवाना वर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वाळूचे बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याबाबत व वाहतूक बाबत तारापूर मंडळ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.
— सुनिल शिंदे, तहसीलदार पालघर
◾खारेकुरण येथील बेकायदा वाळू उत्खनन बाबत चौकशी करण्यासाठी तहसीलदार यांनी सांगितले असून याभागातील तलाठी यांना वाळू वाहतूक प्रकरणी चौकशी करून अहवाल देण्यासाठी सांगण्यात आले आहे. यावर तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल
— अनिल वायाळ, मंडळ अधिकारी तारापूर