- बड्या उद्योजकांच्या वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे वायू प्रदूषण सुरूच असून अशा कारखान्यांना प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे अभय उरलेले नाही. यातच काही बड्या उद्योजकांच्या कारखान्यातील वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. येथील एका स्टील उद्योग कारखान्यातुन वारंवार हवेचे प्रदूषण होत असताना देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरातील गावांमध्ये वायुप्रदूषणाचा स्तर वाढला आहे. विराज प्रोफाईल या स्ट्रील उद्योग कारखान्यातुन रोज मोठ्या प्रमाणात लालसर असलेला धुर सोडला जातो. लोखंडावर प्रक्रिया करताना हा निघणारा रासायनिक व धुळीकण असलेला वायू संपूर्ण परिसरात पसरला जातो. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास होत असताना देखील त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार केला जातो. तरी देखील झोपेचे सांग घेतलेल्या अधिकाऱ्यांना याचा कोणतीही फिकीर नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर असलेले प्रदूषणमापक यंत्र अनेक वर्षांपासून बंद असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही रासायनिक कारखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी उत्पादने घेतली जातात. याचवेळी घातक अशा प्रक्रिया केल्या जात असल्याने त्यातून निघणारे विषारी वायू रात्रीच्या वेळी हवेमध्ये सोडले जातात. रासायनिक कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण होऊ नये यासाठी स्क्रबर सिस्टमचा वापर करणे आवश्यक असते. परंतु ही प्रक्रिया खर्चीक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नाही.
◾तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर, सरावली , कोलवडे, कुंभवली, पाम, पास्थळ व सालवड या गावांतील रहिवाशांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या वायुप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील रहिवार आरोग्यांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नियमांचे उल्लंघन करून रासायनिक वायूचे उत्सर्जन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही.
◾तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांकडून रात्रीच्यावेळी सेडल्या जाणाऱ्या वायुप्रदूषणावर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार होते. परंतु वर्षे उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारचे पथक याठिकाणी नियुक्ती करण्यात आले नाही.
◾ कारखान्यात स्फोट झाल्याचा भास
तारापूर औद्योगिक क्षेत्रात विराज प्रोफाइल या कारखान्यातुन शनिवारी मोठ्या प्रमाणात धुरू बाहेर पडताना दिसत होता. सोशल मीडियावर या कारखान्यात स्फोट झाला असल्याचा मँसेज फिरत होता. याचे कारण देखील तसेच होते कारखान्यातून निघणाऱ्या काळ्याकुट्ट धुर सदृश्य वायूचे प्रमाणात खुप मोठ्या प्रमाणात होते. दिवसेंदिवस विराज प्रोफाइल कारखान्यांचे प्रदूषण वाढत चाललेले असताना व शनिवारी औद्योगिक क्षेत्रात पसरलेल्या वायू प्रदूषणामुळे अशा कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.