यूग्लास फुटल्याने दोन कामगार जखमी; स्फोटा बाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली नाही
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री उत्पादन प्रक्रिया सुरू असताना झालेल्या स्फोटात याठिकाणी आग लागली होती. कारखान्यातील कामगरांनी आगीवर नियंत्रण आणले असून स्फोटाची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली नाही.
औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्लाँट नं. एन 198 या औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी रियाक्टर मध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होती. यावेळी एका रियाक्टर मधून दुसऱ्या रियाक्टर मध्ये रासायनिक पदार्थ पाठवत असताना उलट्या हवेच्या दाबामुळे रियाक्टर जवळ असणाऱ्या यूग्लासचा रात्री 10:10 वाजताच्या सुमारास स्फोट झाला. यावेळी त्याठिकाणी असलेले आँपरेटर प्रदीप पाटील व शांताराम जाधव हे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या स्फोटाची कोणत्याही प्रकारची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.