पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: वसई तालुक्यातील शहरांमध्ये अतिधोकादायक तसेच खंडर इमारती महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. सामान्य लोकांच्या राहण्यासाठी बनविण्यासाठी आलेल्या इमारती आजघडीला गुन्हेगारांचा ठिकाणा बनल्या आहेत. या घरांमध्ये गर्दुल्ले, नशापाणी करणारे आरोपी लपून लुटण्याचे गुन्हे करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई विरार मध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांची मागील पाच वर्षांची गुन्हेगारीची आकडेवारी काढली तर गर्दुल्ल्यांचा, नशा पाणी करणाऱ्यांचा मोठा हाथ असल्याचे निष्पन्न झाले आहे. नशेमध्ये हत्या, हाणामारी, लूट, विनयभंग, दरोडे, चोरी अश्या अनेक घटना यांना सामान्य वाटतात. वसई तालुक्यातील शहरांमध्ये अनेक अतिधोकादायक आणि खंडर इमारती यांच्या लपण्याचा अड्डा बनला आहे. सर्वात जास्त अतिधोकादायक आणि खंडर इमारती नालासोपारा शहरात आहे. याच इमारतीमध्ये संध्याकाळ झाली की गर्दुल्यांचा वावर वाढतो. नशा करण्यावरून यांच्यामध्ये अनेक वेळा वाद होतात. या इमारतीच्या आजूबाजूने कोणी संध्याकाळच्या वेळेला गेलेतर हे गर्दुल्ले त्यांची अडवणूक करून त्यांना लुटण्याचे प्रकार करतात. जर विरोध केला तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतात.
वसई तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून, महिन्यापासून काही इमारतीचे बांधकाम काहींना काही कारणावरून बंद पडल्याने त्याही इमारती या गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम बंद आहे त्या इमारतीच्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिकांनी सुरक्षा रक्षक तरी ठेवणे काळाची गरज झाली आहे किंवा आजूबाजूला लाईटची सुविधा तरी करून ठेवली पाहिजे. पोलिसांनी अश्या इमारतीबाबत सर्व्हे करून सदर बांधकाम व्यवसायिकांना नोटीस दिल्या पाहिजेत अशी मागणी नागरिक करत आहे. जेणेकरून निर्दोष नागरिकांचा गर्दुल्यांच्या हल्ल्यात जीव किंवा त्यांना लुटले जाणार नाही.
काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या सद्दाम शेख याची काही वर्षांपासून बंद पडलेल्या इमारतीमध्ये नेऊन पाच आरोपींनी गळ्यावर वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली होती. गेल्या वर्षी पूर्वेकडील परिसरात निर्मानधीन इमारतीत चार आरोपी तरूणांनी एका अल्पवयीन पीडित मुलीसोबत गॅंगरेपची घटना घडली होती. 6 डिसेंबर 2017 साली पूर्वेकडील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या प्रज्वल संतोष घाडी (20) या आयटीआय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तुळींज पोलीस ठाण्यामागील साई बाजार परिसरातील खंडर इमारतीत हत्या करण्यात आली होती. 15 सप्टेंबर 2018 साली मोरेंगाव परिसरात राहणाऱ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून संख्येश्वर नगरमधील एका जुन्या इमारतीच्या छतावर नेऊन कुत्रे आणि कीड किडक्यांची भीती दाखवून अत्याचार केला होता. जानेवारी 2018 साली संख्येश्वर नगरमधील 18 वर्षीय तरुणीला ओळखीच्या आरोपी तरुणाने अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये नेऊन मित्रांसोबत मिळून अत्याचार केला होता. एप्रिल 2019 मध्ये आत्मवल्लभ या अतिधोकादायक आणि खंडर इमारतीजवळ एका महिलेच्या गळ्यातून गर्दुल्यांनी सोन्याची चेन खेचुन चोरी केली होती. अतिधोकादायक आणि खंडर इमारतीमध्ये अनेक घडलेल्या घटना तर पोलीस ठाण्यापर्यंत भीतीपोटी पोहचत नाही.
◾ नालासोपारा पूर्वेकडील आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांनी खाली केलेल्या अतिधोकादायक व खंडर इमारतीबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येईल. त्या इमारती मनपाने जमीनदोस्त कराव्या अश्या आशयाचे पाच दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
— डी एस पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे
◾खंडर इमारती महानगरपालिकेने कारवाई करून भुईसपाट केल्या पाहिजे. असे केल्याने गर्दुल्यांचा याठिकाणी होणारा वावर थांबेल आणि चोरीच्या घटनांना नक्कीच आळा बसेल
— जितू मेहता, स्थानिक रहिवासी