◾ निविदा मंजूर होऊन दोन वर्षे झाली तरी सार्वजनिक बांधकाम खात्याला काम करण्याचा मुहूर्त नाही; राष्ट्रीय रस्ते प्रकल्प योजना ठरली फेल
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहिल्यावर हाच का विकास असा प्रश्न निर्माण होतो. याचे कारण देखील तसेच असून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बोईसर तारापूर रस्त्यांची दैनिय अवस्था झाली आहे. येथील चित्रालय भागात मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील येथील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार होत असताना देखील कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.
राष्ट्रीय रस्ते निर्मीती कामाला सुरूवात झाल्याने यावर्षी तरी बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यावर असलेल्या चित्रालय रस्ता सुस्थितीत होईल अशा आशेवर असलेल्या नागरीकांचा भ्रमनिरास झाला आहे. हा रस्ता तारापूर अणुऊर्जा प्रकल्पा कडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वळदळ असते. यातच अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामगार वसाहती याच भागात असल्याने हा भाग दिवसभर गजबजलेला असतो. मात्र तरीही याभागातील रस्त्याच्या दुरूस्ती कडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या भागात काय विकास झाला हे या रस्त्यावरून स्पष्ट होते. टाळेबंदी बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यांचे रूंदीकरण, डांबरीकरण व काही भागात काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तरीही चित्रालय याभागातील रस्त्याच्या कामा हाती घेतले नाही. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्या नंतर येथील रस्त्यावर मलमपट्टी करून खड्डे भरण्यात आले होते. परंतु आता पुन्हा हा रस्ता खड्डेमय झालेला असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय रस्ते निर्मीती प्रकल्पा अंतर्गत गुजरात येथील मिलन बिल्टेक या कंपनीला रस्ते बांधकाम करण्याचा ठेका सन 2018 मध्ये देण्यात आला होता. बोईसर- तारापूर रस्त्यावर रस्त्यांचे रूंदीकरण करून बांधकाम करताना ज्या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात त्याठिकाणी काम करणे अपेक्षित होते. मात्र जे रस्ते चांगल्या स्थितीत होते त्याच ठिकाणी रस्ते बांधकाम सुरू केल्याने चित्रालय भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. टी. बडे यांनी 10 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रतिक्रियेत या रस्त्याचे काम 10 दिवसात सुरू केले जाईल असे सांगितले होते. मात्र दिड महिना उलटून देखील या रस्त्यांचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग काम करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾ राष्ट्रीय रस्ते निर्मीती अंतर्गत पालघर जिल्ह्यात अनेक भागाचे काम हाती घेण्यात आले असून 125 कोटीचा ठेका देण्यात आला आहे. याच प्रकल्पा अंतर्गत बोईसर- तारापूर रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र स्थानिक पातळीवर अनेक ठेकेदारांना काम दिल्याने कामाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले होते.
◾ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांन मुळे वाहने जोरदारपणे खड्ड्यात आढळतात त्यामुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे. याभागातुन रेल्वे स्थानक परिसर व तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात जाण्यासाठी हा मुख्य व नागरीकांच्या सोईचा रस्ता असल्याने नागरीकांना नाईलाजाने खड्डे असलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. यामुळे वाहन चालकांना नादुरुस्त वाहनांची दुरूस्ती करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.