◾ गाण्याला एका दिवसात 50 हजारांहून अधिक लोकांची पसंती
पालघर दर्पण: सचिन भोईर
वाडा: चित्रपटसृष्टी हे एक अस माध्यम आहे ज्यात रात्रीत कुणीही प्रसिद्धीच्या शिखरावर चढू शकतो किंवा जमीनदोस्त होऊ शकतो मात्र सध्या सुरू असलेल्या वातावरणाने हे क्षेत्र मक्तेदारीच्या चिखलात अडकून पडल्याचे जाणवत आहे. अशा अवस्थेतही काही गुणी कलाकार आपले कौशल्य सिध्द करतात ज्याची प्रचिती नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘आदिवासी राजा’ या गण्यावरून येते.
जगदीश भुसारा हा जव्हारमधील बाळकापरा या छोटेखानी गावातील रहिवासी असून तो सध्या जव्हार येथे एका मोबाईल दुकानात काम करतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने गोड घशाच्या जगदीशला गायन क्षेत्रात अनेक ठोकरा खायला मिळाल्या मात्र याच क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा त्याचा मित्र महेश भोये याने पूर्ण करण्याचे ठरवले. आदिवासी संस्कृती ही पूर्वीपासून निसर्गाला देव मानणारी असून आपल्या देवीदेवतांची पूजा आदिवासी लोक वंदनीय मानतात. याच देवतांवर गाण्याच्या रूपाने स्तुती सुमने उधळणारे लिखाण जगदीश याने केले. साध्या मोबाईलवर घरीच रेकॉर्ड केलेल्या गाण्याला संगीतकार रोहित खुताडे याने नंतर संगीतबद्ध केले.
युट्युब या समाजमाध्यमावर हे गाणं प्रसिद्ध करण्यासाठी महेश भोये यांनी निर्मिती करण्याची तयारी दर्शविली. विक्रमगड येथील नृत्य कलाकारांनी या गाण्यात आपल्या नृत्याने रंगत आणली ज्यात राहुल जोगमार्गे, अश्विन सांबरे ,नितीन ठाकरे यांनी छायाचित्रात करून निसर्गाचे दैवीरूप पडद्यावर आणले. तर तेजश्री जाधव, वैष्णवी गुजराती, भावना चौधरी, दर्शना महाले, भक्ती भानुशाली, विपुला गोरखा, ऐश्वर्या पवार, निलेश साबळे, विवेक उराडे, योगेश पढेर, सचिन बात्रा, महेंद्र नडगे, शैलेश पढेर, कौशिक वाढे या ग्रामीण कलाकारांनी या गाण्याच्या माध्यमातून आपल्या कलेने सर्वांना वेड लावले आहे.
या गाण्याला युट्युबवर पसंती मिळत असून एकाच दिवसात या 50 हजारहुन अधिक जणांनी आपली पसंती दर्शविली आहे. त्यामुळे आपल्या भागातील या ग्रामीण कलाकारांना आपणही पसंती देण्यासाठी युट्युबवर हे गाणं पाहून त्याला लाईक करा असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.