◾ बोईसर ग्रामीण रुग्णालय धोकादायक स्थितीत असल्याने रुग्ण सुरक्षा धोक्यात; सरकारी जागा उपलब्ध असताना देखील एकाच ठिकाणी वादग्रस्त असलेल्या जागेच्या हट्टापायी नागरिकांना वेठीस
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: लाखोची लोकसंख्या असलेल्या बोईसर शहराची आरोग्य यंत्रणा सलाईनवर असून येथील भाड्डे तत्वावर असलेली आरोग्य केंद्राची इमारत देखील मोडकळीस आली आहे. याठिकाणी दररोज शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी ये असल्याने याठिकाणी नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. अतिशय कमी जागेत असलेले रुग्णालय यामुळे नागरिकांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत असून इमारत देखील धोकादायक असल्याचे रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
बोईसर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून याभागात नागरीकरण देखील वाढले आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार हे याच बोईसर व आजूबाजूला असलेल्या भागात राहतात. मात्र तरीही येथे ग्रामीण रुग्णालयाची स्वतंत्र इमारत नसून सद्या धोकादायक इमारती मध्ये सुरू असलेले ग्रामीण रुग्णालय हे फक्त नावा पुरतेच असल्याचे दिसून आले आहे. छोट्याश्या पडीत जुन्या धोकादायक इमारती मध्ये बोईसरचा आरोग्याचा गाडा चालवला जात असून येथे नवीन इमारती च्या उभारणी साठी प्रशासन देखील चालढकल करत असल्याचे दिसून येते. सद्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची रचना प्रत्येक्षात ग्रामीण रुग्णालय प्रमाणे नसल्याने विविध विभाग याठिकाणी कार्यरत नाहीत. यातच दोन डाँक्टर पदे देखील याठिकाणी रिक्त असून कर्मचारी संख्या देखील कमी आहे. याठिकाणी दररोज बाह्य रुग्ण तपासणी साठी 250 ते 350 रुग्ण सरासरी येत आहेत. याचा संपूर्ण ताण येथील डाँक्टर व कर्मचारी यांच्या वर पडत असून आहे त्या स्थितीत धोकादायक इमारतीत रुग्णसेवा दिली जात आहे.
बोईसर येथील सद्यस्थितीत सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. यातच बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूर असून देखील जागेचा तिढा कायम असल्याने हे रुग्णालय नेमके केव्हा उभारणी केले जाईल याची कोणालाही खात्री नाही. कारण चित्रालय भागात असलेल्या बीएआरसी वसाहतीच्या बाजूला असलेल्या जागेवर रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या जागेवर बीएआरसी कडून दावा केला जात असल्याने व पालघर सत्र न्यायालयात याबाबत याचिका दाखल असल्याने जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. मात्र एकच जागेचा हट्ट करत बसण्यापेक्षा इतर जागेचा पर्याय उपलब्ध करून त्वरित रुग्णालय उभारणी कडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांन कडून वारंवार होत आहे. तरी देखील प्रशासना कडून जागेबाबत कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला जात नाही. यामुळे बोईसरच्या नागरिकांना नेमके कधी रुग्णालय मिळणार याकडे फक्त लक्ष देवून बसावे लागणार आहे.
◾ सरकारी जागा भूमाफियांच्या घशात
जिल्हा प्रशासन जागेचे कारण पुढे करत असले तरी बोईसर ग्रामीण रुग्णालय असलेल्या काही अंतरावर सरावरी ग्रामपंचायत हद्दीत संजय नगर येथे दोन एकर सरकारी जागा पडीत आहे. याठिकाणी गेल्या वर्षी भूमाफियांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायत अधिकारी यांना हाताशी घेवून याठिकाणी एक बेकायदेशीर बांधकाम करून त्याठिकाणी घरपट्टी देखील लावण्यात आली होती. ही संपूर्ण जागा महसूल विभागाने आरोग्य विभागाला तातडीने हस्तांतरित केल्यास याठिकाणी बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारतीचे बांधकाम मार्गी लागता येईल.
◾ बोईसर ग्रामीण रुग्णालय इमारत धोकादायक स्थितीत असल्याने रुग्णालय इतरत्र ठिकाणी हलविण्याची अत्यंत आवश्यक आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी रुग्णालयाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतु इतर ठिकाणी असलेल्या जागेबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतलेला नाही.