◾ भाताच्या नामशेष होत चाललेल्या देशी वाणांचे होतेय दर्शन
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: तालुक्यातील कशिवली गावातील शेतकऱ्यांने सेंद्रिय शेती बचतगटाच्या माध्यमातून भाताच्या 55 जातीच्या देशी वाणांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यासह कोकणाची भौगोलिक भागाची ओळख असणाऱ्या मात्र सध्या नामशेष होत चाललेल्या सत्त्वयुक्त गावरान भाताच्या जाती येथे पाहायला मिळत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील निंबळेपाडा येथील अंकुश भोये या शेतकऱ्याने देशी भाताच्या 55 जातीच्या वाणांचा यशस्वी प्रयोग केला आहे. सध्या अधिक उत्पन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून संकरित बियांनांचा आणि खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे देशी, गावरान असलेल्या भाताचे वाण नष्ट होत चालले आहे. त्यातच खतांच्या वापरामुळे गावरान-देशी वाण तग धरू शकत नसल्याने त्यांचा वापर शेतकऱ्यांकडून कमी कमी होत नंतर जवळपास बंदच होत गेला. देशी- गावरान भातामध्ये असलेले विविध गुण मात्र संकरित भातामध्ये दिसून येत नसल्याने आजच्या धकाधकीच्या युगात पुन्हा विविध गुणकारी आणि पौष्टिक असलेल्या आणि सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या देशी- गावरान भातपिकांना मागणी वाढत चालली आहे.
या मागणीचा विचार करत विक्रमगड तालुक्यातील कशिवली गावातील निंबळेपाडा या गावातील सेंद्रिय शेती बचत गटाच्या माध्यमातून आणि वाडा तालुक्यातील गालतारे येथील इस्कॉन यांच्या सहकार्यातून अंकुश शंकर भोये यांच्या शेतात जवळपास 30 गुंठा जागेत हलवार-कसबई, पाचएकी, गावठी झिनी, कुडय, वाडा कोलम, मसाला जव्हार, अश्विनी जव्हार , काल कुडय , डांगीडुंगी डहाणू, गावठी तोरण्या, गावराण बासमती, सुरती,सुवर्णा, नजर, पालघर 3 अशा विविध 55 प्रकारच्या देशी भाताच्या जातींची प्रयोगिक तत्वावर लागवड केली असून नामशेष होत चाललेल्या अनेक भाताच्या जाती येथे बघायला मिळत आहेत. ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली आहे. सध्या ही भातशेती चांगल्या प्रकारे पिकली आहे.
देशी भातापासून तयात झालेला तांदूळ हा सत्त्वयुक्त, पौष्टिक असतो. तसेच मधुमेह टाळण्यासाठीही देशी भाताच्या जाती अत्यंत उपयुक्त आहेत. तसे गुणधर्म त्यात आहेत. यात हातसडीच्या तांदळाला सध्या मोठी मागणी वाढत आहे. आरोग्याबाबतीत सध्या नागरीक सजग झाल्याने तो चांगल्या दराने विकला जाऊ लागला आहे मात्र त्यासाठी या भाताच्या देशी वाणांची जोपासना करणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे महत्वाचे आहे. या बियांनाच्या जोपासणीसाठी अंकुश भोये प्रयत्न करत असून त्यांनी आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली आहे. यासाठी त्यांनी एक गिर जातीची गाय पाळली असून तिच्या गोमूत्र आणि शेणाचा वापर ते आपल्या शेतात सेंद्रिय शेती करण्यासाठी करतात.तसेच आपल्या घराशेजारीच गांडूळ खतसुद्धा बनवून त्यांनी आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय बनवली असून दरवर्षी 15 ते 16 हजारांवर होणारा रासायनिक खतांवरील आणि बियांनावरील खर्च देखील त्यांचा वाचला आहे.त्यातच अंकूश भोये आणि सेंद्रिय शेती बचतगटाकडून उन्हाळ्यात सेंद्रिय खतावर पिकविलेल्या भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.
त्यांना या भाताच्या विविध देशी जातीच्या लागवडीसाठी वाडा तालुक्यातील गालतरे येथील इस्कॉन संस्थेचे आणि धालनवाडे प्रभुजी मोठे सहकार्य लाभले असून त्यांच्याकडून त्यांना हे 55 जातींच्या भाताचे बियाणे मिळण्यास सहकार्य झाले आहे. या भातलागवडीसाठी अंकूश भोये यांना सेंद्रिय शेती बचत गटाच्या मधुकर निंबाळा, संतोष सुतार,परशुराम तरे, प्रकाश निंबाळा, सदानंद टोकळे, हरेश तुंबडा आणि इतर शेतकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.
◾ अनेक देशी भाताच्या जाती “औषधी भात’ म्हणूनच परिचित आहेत. क्षयरोगी, अशक्तपणा असणाऱ्यांना, बाळंतिणीस पत देण्यासाठी, दीर्घ मुदतीच्या आजारी रुग्णांना या जातींचा तांदूळ उपयुक्त आहे. या देशी जातींत विविध जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम यांचे प्रमाण संकरित वाणांपेक्षा खूपच अधिक आहे. या देशी भातापासून तयार होणार तांदूळ पचनास हलका, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. त्यामधील अनेक जातींमध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असणाऱ्यांना या गावरान- देशी जातीचे भात उपयुक्त आहे.
◾ सध्या संकरित जातीच्या भातामुळे देशी भाताच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.त्याचे संवर्धन व्हावे म्हणून आम्ही या वर्षापासून सुरवात केली असून माझ्या शेतात 55 प्रकारच्या विविध देशी जातींच्या वाणांची लागवड केली आहे. ही सर्व पीके चांगली पिकली आहेत. या वर्षी आम्ही बियाणे बँक बनवली असून सेंद्रिय खतांचा वापर करून देशी वाणांची लागवड करण्यास आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत.
— अंकूश भोये, शेतकरी कशिवली(निंबळेपाडा)