◾ ६ राज्यातील ७६३ खेडेगावातील एक लाख लोकांना स्वामीत्व योजनेचा लाभ.
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी स्वामित्व योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार जमीनधारक त्याच्या संपत्तीचा वापर कर्ज घेण्यासाठी तसेच इतर आर्थिक लाभासाठी करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेची अंमलबजावणी रविवारी ११ आँक्टोबर रोजी केली असून व्हिडीओ कॉन्फरंन्सच्या माध्यमातून ६ राज्यातील ७६३ खेडेगावातील एक लाख लोकांना या योजनेच्याद्वारे घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले. व या लाभार्थ्यांनी स्वामित्व कार्ड ऑनलाईन डाउनलोड केले.
यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपल्याकडे असे म्हंटले जाते की भारताचा आत्मा हा खेडेगावात आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की या खेडेगावांकडे आतापर्यंत सगळ्यांचे दुर्लक्षच झालेले आहे. स्वामित्व योजना ही खेडेगावात राहणाऱ्यांसाठी आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करेल. मी खेडेगावातील माझा बांधवांना त्यांच्या नशिबावर सोडून देणार नाही. ही योजना ४ वर्षे राबवली जाणार असून पंचायत राज मंत्रालयाकडून हि योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना रेकॉर्ड ऑफ राईट्स देण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणे हा आहे. या द्वारे ६.६२ लाख गावांना लाभ दिला जाणार आहे.
स्वामित्व योजना आणण्याचे कारण सांगत मोदी म्हणाले, जगभरात केवळ एक तृतीयांश लोकांकडेच आपल्या संपत्तीचे कायदेशीर रेकॉर्ड आहे. तर दोन तृतीयांश लोकांकडे ते नाही. यामुळे आपल्या लोकांकडे त्यांच्या संपत्तीचे कायदेशीर रेकॉर्ड असणे हे भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. स्वामित्व योजनेमुळे आपल्या ग्राम पंचायतींचेही व्यस्थापन नगरपालिका आणि महानगरपालिका व्यवस्थापन होईल. त्याच बरोबर योजनेचे फायदे असे की, संपूर्ण जगातील मोठं-मोठे एक्स्पर्ट सांगतात देशाच्या विकासात जमीन आणि घरावरील मालकी हक्काची मोठी भूमिका असते. जेव्हा प्रॉपर्टीचे रेकॉर्ड असते आणि संपत्तीवर अधिकार असतो तेव्हा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो. बँकांकडुन कर्ज मिळते व स्वयंरोजगाराचे मार्ग निर्माण होतात. त्याच बरोबर गुंतवणुकीचे दरवाजे खुले होतात.
◾ स्वामित्व योजनेचा फायदा हा 6 राज्यांतील 763 गावातील लोकांना होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशातील 346, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, मध्य प्रदेशातील 44, उत्तराखंडातील 50 आणि कर्नाटकातील 2 खडेगावांचा समावेश आहे.