■महामार्गावरील धूर करतोय वाहनचालकांनाचा घात; धुळवडीने नागरिक त्रस्त.
पालघर दर्पण : सचिन भोईर
विक्रमगड :भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेसाठी आंदोलने व निवेदने यांचा पूर आलेला असतानाही महामार्गाच्या अवस्थेत काडीमात्र फरक पडलेला नाही. रस्त्यांवरील खड्डयांसोबत आता धुळीचा सामना येथील वाहनचालकांना करावा लागत आहे.
भिवंडी ते वाडा-मनोर या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जिजाऊ संस्थेने रास्तारोको केला. त्यानंतर स्वाभिमान संघटनेने निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे आश्वासन देऊन मातीने खड्डे भरून किरकोळ मलमपट्टी केली होती. मात्र आजही रस्त्याच्या अवस्थेत टीचभर फरक पडलेला पाहायला मिळत नाही.
कुडूस ते वाडा मार्गावर असंख्य जीवघेणे खड्डे आजही जैसेथे असून वाडा-मनोर महामार्गावरील वरले, सापणे, पाली, पोशेरी या भागातही खड्डेच खड्डे आहेत. पावसाळ्यात पडलेल्या चिखलाचा त्रास वाहनचालकांनी सहन केला. मात्र आता याच चिखलाचे धुळीत रूपांतर होऊन महामार्गावर धुके पडावे अशी धुळीची चादर पसरलेली असते. ज्याचा प्रामुख्याने दुचाकीस्वारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांची गैरसोय लक्षता घेता तात्काळ या मार्गावर शास्त्रोक्त पद्धतीने रस्त्याचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.
◾ वाडा ते कंचाड भागात अनेक ठिकाणी निव्वळ माती व कच यांद्वारे खड्डे भरणी केली असून अतिशय धोकादायक अवस्था या मार्गाची आहे. वाडा ते कुडूस हा मार्ग तर धुळीमुळे जणू ढगातून प्रवास करीत असल्याचा अनुभव आम्हाला येतो जे आरोग्याला देखील बाधा आणणारे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावा.
— केदार नाईक, सामाजिक कार्यकर्ते
◾ महामार्गावर शास्त्रोक्त पद्धतीने डांबरीकरण करून खड्डेभराई केली जाईल. ज्याचे काम सुरू आहे. यासाठी 3 कोटी रुपये खर्चून यंत्रणा सज्ज झाली आहे. जी लवकरच हे काम पूर्ण करील.
— अनिल बरसट, अभियंता,सा. बां. उपविभाग, वाडा