◾ दारूची दुकाने उघडली पण जिमखाने मात्र बंदच; जिम चालक आणि मालक आर्थिक संकटात
पालघर दर्पण: मयूर पडवेकर
नालासोपारा: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे पण यातच समाधानकारक गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त बरे होण्याची संख्या ही सुद्धा वाढत आहे. त्यामुळे शासनाने सहा महिन्यांपासून बंद असलेल्या व्यवसायांना अटी नियमांसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी ,अशी मागणी जिम चालक आणि मालक करत आहेत.
शासनाकडून जिम सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी शासनाने हॉटेल तसेच दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली त्यामुळे अर्थकारणाची दारू दुकाने सुरू झालेले चालतील पण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेली जिम बंद का ? असा सवाल जिम मालकांकडून उपस्थित केला जात आहे. मार्च महिन्यापासून बंद झालेले काही व्यवसाय हे ऑगस्टच्या सुरवातीपासूनच अटी नियमांसह सुरू करण्यात आले. अनेक व्यवसायांना शासनाकडून आर्थिक पँकेज जाहीर करण्यात आले परंतु सात महिने उलटून सुद्धा जिम सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याच बरोबर जिम व्यावसायिकांसाठी शासनाकडून कोणतीच दिलासादायक बातमी आली नाही. त्यामुळे जिम मालक हा आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अनेक जिमखान्यांना आता टाळे ठोकण्यात आले आहेत.
अनलॉक १ मधेच अनेक राज्यात केश कर्तनालये सुरू करण्यात आली होती परंतु महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरू करण्यासाठीसुद्धा लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे शासनाने जिम व्यवसायसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. कोरोनावर प्रतिबंधक उपाय करीत आता हळूहळू सर्वच बाबी खुल्या करणे गरजेचे आहे. त्यात त्या क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार याचा तपशील शासनाने सादर करून ती क्षेत्रे लवकरात लवकर खुली करण्यात यावी ही मागणी सध्या जोर धरत आहे.