◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय सुरू असलेल्या प्रदूषणकारी बेकायदेशीर कारखान्यांन कडे दुर्लक्ष; तारापूरचे शेकडो प्रदूषणकारी कारखान्यांचे आजूनही प्रदूषण सुरूच
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूरच्या प्रदूषणावर लक्ष देत राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र यामध्ये अनेक बेकायदेशीर पणे सुरू असलेले कारखाने निसटले असल्याने कारवाई बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी असलेल्याच कारखाने व रेड झोन मध्ये असलेल्या कारखान्यांची तपासणी यावेळी करण्यात आली होती. परंतु परवानगी नसलेल्या अतिशय प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी केली नसल्याने हे कारखानदार कारवाई मधून निसटले आहेत.
तारापूर मधील प्रदूषणा बाबत अखिल भारतीय मांगेला समाज परिषदे कडून राष्ट्रीय हरित लवादा कडे याचिका दाखल करण्यात आली होती. यानुसार तारापूर मधील प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करून पर्यावरणाचे झालेले नुकसान म्हणून उपाययोजनांसाठी राष्ट्रीय हरित लवादाने येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह प्रदूषणकारी कारखान्यांना 160 कोटी 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये 102 प्रदूषणकारी कारखान्यांवर नुकसानभरपाई ची जबाबदारी निश्चित केली होती. मात्र तारापूर मधील बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या प्रदूषणकारी कारखान्यांची साधी तपासणी देखील करण्यात आली नव्हती. राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या समितीत केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अहमदाबादचा प्रतिनिधी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अहमदाबादचा एक प्रतिनिधी, नॅशनल एन्वायरोन्मेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट चा शास्त्रज्ञ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला होता.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असलेल्या व रेड झोन मध्ये असलेल्याच कारखान्यांची तपासणी राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या समितीने केली. यामुळे शेकडो प्रदूषणकारी बेकायदेशीर पणे सुरू असलेले कारखाने यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने ते या कारवाईतुन अलगदपणे निसटले आहेत. येथील प्रदूषणकारी कारखान्यांची माहिती स्थानिक अधिकारी व प्रादेशिक अधिकारी यांना उत्तम रित्या माहिती आहे. समितीने तपासणी दरम्यान स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांना दुर ठेवले असले तरी प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे यांनी मात्र येथील प्रत्येक्षात बेकायदेशीर सुरू असलेल्या प्रदूषणकारी कारखान्यांची माहिती समिती पासून लपवली का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. यातच अशा प्रदूषणकारी कारखान्यांंची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर देखील वरिष्ठ पातळीवर ठोस कारवाई केली जात नाही. एखाद दुसऱ्या कारखान्यांवर कारवाई जरी केली तरी बँकेच्या हमी पत्रांवर कायद्यातील पळवाटा शोधून कारखान्यांना मोकळीक दिली जात असल्याचे आजवर झालेल्या प्रकारातून उघडकीस आले आहे.
◾ शेकडो प्रदूषणकारी कारखान्यांचे प्रदूषण सुरूच
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांचे वायू प्रदूषण व जल प्रदूषण सुरूच असल्याचे रोजच दिसून येते. राष्ट्रीय हरित लवादाने काही कारखान्यांवर दंडात्मक कारवाई जरी केली असली तरीही येथील उद्योजक आपल्या कारखान्यांच्या कार्यपद्धती मध्ये सुधारणा करण्याच्या तयारीत अजिबात नसल्याचे दिसून येते. अनेक कारखान्यांन समोर आजही रासायनिक सांडपाणी साचलेले असते. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात देखील रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी सोडून दिले जात असल्याने नैसर्गिक नाले, खाडी, शेतजमिनी व समुद्र किनारे अतिशय प्रदूषित होत चालले आहेत.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात ग्रीन झोन मध्ये देखील काही रासायनिक कारखानबेकायदेशीर पणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. तर काही ठिकाणी रासायनिक घनकचरा साठवून ठेवण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यान पासून चर्चेत असलेल्या बजाज हेल्थ केअर कारखान्यांने हस्तांतरित केलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचरा साठवून ठेवल्याचे उघड झाले होते. याच कारखान्यांने मोठ्या प्रमाणात रासायनिक घातक घनकचरा व टाकावु रसायन बेकायदेशीर पणे वाहतूक करताना पोलिसांनी देखील कारवाई केली होती. यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या समितीने याअगोदरच अशा प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी केली असती तर नैसर्गिक हानी काही प्रमाणात टाळता आली असती.
◾ तारापूर मधील इतर प्रदूषणकारी कारखान्यांन कडे केलेले दुर्लक्ष याबाबत प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना दोन दिवस वारंवार संपर्क साधला असता देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर मधील प्रदूषणाबाबत किती गंभीर आहे ते दिसून येते.