◾ कोंबड्या पालन व्यवसायिकांना सुगीचे दिवस; वाड्यात रोज होते ५० हजार अंड्यांचे उत्पादन.
पालघर दर्पण : रमेश पाटील
वाडा: तालुक्यातील खानिवली, सावरोली, सासणे, नारे व नाणे या गावांमध्ये काही तरुणांनी तर काही सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा ते सात वर्षांपासून अंडी देणाऱ्या कोंबड्या पालन व्यवसाय सुरु केला आहे. करोनाच्या सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसणाऱ्या या व्यवसायिकांना करोनाच्या चार महिन्यांनंतर करोनामुळेच अंड्यांचे दर वाढल्याने सुगीचे दिवस आले आहेत.
अंड्यातुन मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात व रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास अधिक मदत होत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून अंड्यांची मागणी दुप्पट झाली आहे. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात अंड्याचा दर सात ते साडेसात रुपये झाला आहे. त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या व्यवसायिकांना अंड्यांचे दर साडेपाच ते सहा रुपयांपर्यंत मिळत आहेत. दरवाढीमुळे गेल्या सहा वर्षांमध्ये या व्यवसायिकांना पहिल्यांदाच सुगीचे दिवस पहायला मिळालेले आहेत.
करोनाचा सुरवातीचा काळ या व्यवसायासाठी खुपच मारक ठरला. करोनाचा प्रसार चिकन व अंड्यांपासुन होतो, अशा अफवा पसरविण्यात आल्याने तब्बल दोन महिने या व्यवसायावर मोठे संकट आले होते. दोन रुपयांपर्यंत अंड्याचा दर कोसळल्याने कोंबड्यांना दिवसागणिक खाद्यासाठी करावा लागणारा खर्च जास्त व दिवसाला मिळणाऱ्या अंड्यांची किंमत कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सावरोली व मासवण येथील जाॅन डिकोस्टा यांच्या पोल्ट्री फार्म मधील अंडी देणाऱ्या 65 हजार कोंबड्यांना टाळेबंदीमुळे वेळीच खाद्य पुरवठा न झाल्याने त्यांच्या 22 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडून त्यांचे 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
◾ महसुल विभागातील मंडळ अधिकारी या वरिष्ट पदावरुन सेवा निवृत्त झालेले वाडा तालुक्यातील मौजे खानिवली येथील अनंता दुंदू पाटील या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यानी मिळालेली सेवानिवृत्ती उत्पादन व भविष्य निर्वाह निधीची सर्व पुंजी सहा वर्षांपूर्वी (1914) अंडी देणाऱ्या कोंबड्या पालन व्यवसायात गुंतवली. या व्यवसायात त्यांना मिळणारा दर व होणारा खर्च यांचा मेळ जुळविण्यासाठी अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी हा व्यवसाय मोठ्या जिद्दीने आतापर्यंत सुरुच ठेवला. आणि आता त्यांना या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत आहे.
◆अनंता पाटील यांच्या ‘साई एग्ज फाॅर्म’ मध्ये अंडी देणाऱ्या दहा हजार कोंबड्या आहेत. या कोंबड्यांसाठी सर्व सुविधांची व्यवस्था केलेली आहे. या दहा हजार कोंबड्यांपासुन त्यांना साडे आठ ते नऊ हजार अंडी दररोज मिळतात.
◆सावरोली व मासवण (पालघर) येथे जाॅन डिकोस्टा यांचा गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवसाय सुरु आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांनी 65 हजार कोंबड्यांचे पालन केले असुन त्यांना दररोज सरासरी 55 ते 57 हजार अंडी मिळतात. या सर्व अंड्यांना बोईसर, पालघर, भिवंडी या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे.
◆सासणे येथे रुपेश म्हात्रे यांनी या व्यवसायासाठी दहा हजार कोंबड्यांचे पालन केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या व्यवसायात त्यांना सुरवातीला चांगला नफा मिळाला. मात्र यावर्षी मार्चमध्ये सुरु झालेल्या करोनाच्या टाळेबंदीत या व्यवसायात मोठा फटका बसला असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
व्यवसायिकांचे म्हणणे:
◆मार्च ते मे हे तीन महिने अधिक तापमान वाढत असल्याने या तीन महिन्यांत कोंबड्यांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी तर होतेच, पण या वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्या मरण्याचे प्रमाणही अधिक वाढते. तसेच या कालावधीत अंड्यांचे दरही खाली येत असतात. त्यामुळे उष्णता वाढीच्या कालावधीत हा व्यवसाय सांभाळणे खुप जिकिरीचे असते.
◆अंड्याचा दररोजचा दर हा राष्ट्रीय पातळीवरील समिती ठरवत असते. हा दर पंधरा दिवस अथवा एक महिन्यासाठी स्थिर असणे आवश्यक आहे. पण तसे काही घडत नसल्याने लहान व्यवसायिकांना त्याचा मोठा परिणाम सहन करावा लागतो. या कमी- जास्त दरामुळे मोठ्या तोट्यालाही सामोरे जावे लागते. करोनाच्या टाळेबंदीत खाद्याचा पुरवठा वेळच्या वेळी होत नसल्याने त्याचा परिणामही या व्यवसायावर होत आहे.
◆अंड्यांचे दर हे दररोज बदलत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर निश्चित होतो. महिनाभरासाठी तरी दर स्थिर राहिले पाहिजेत.
◆दरवाढ कमी होत असताना या अंड्यांचा साठा करण्यासाठी संपुर्ण पालघर जिल्ह्यात कुठेच स्टोरेजची व्यवस्था नाही. त्यामुळे मालाची साठवणुक करता येत नाही.