दोन कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या कुणबी समाजाचा हक्काचा प्रतिनिधी देण्यासाठी राज्यपालांची भेट; मुंबई सह कोकणातील कुणबी समाज एकवटला हक्काच्या नेतृत्वा साठी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या कुणबी समाजाला राजकीय आरक्षणाचा फटका बसल्याने हा समाज राजकीय दृष्टीने आपल्या समाजाला न्याय देवु शकला नाही. यामुळे संपूर्ण मुंबई सह कोकणातील कुणबी समाजाच्या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रतिनिधींनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेत कुणबी समाजाला स्थान देण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय उदासीनते मुळे दुर राहिलेल्या समाजाला राज्यपालांन कडून संधी मिळाल्यास अनेक वर्षांपासून राजकीय दृष्टीने दुर असलेल्या समाजाला हक्काचे नेतृत्व मिळणार आहे.
ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील राजकिय आरक्षणामुळे १९७७ सालापासून बहुसंख्येने असून देखील कुणबी समाज राजकीय दृष्ट्या बेदखल झाला आहे. याभागात कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त असताना देखील येथे असलेल्या राजकीय आरक्षणामुळे समाजातील अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी आजवर फक्त अनेक पक्षांचे झेंडे खांद्यावर फिरवण्याची नामुष्की ओडावली आहे. याच साठी कुणबी समाजातील महत्त्वाच्या प्रतिनिधी यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून आपल्या समस्या व आरक्षणामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात समाजाचे झालेले नुकसान याची माहिती दिली. यातच संपूर्ण कोकणात कुणबी समाजाची दोन कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असून देखील विधिमंडळात एकही कुणबी समाजाचे प्रश्न मांडणारा सदस्य नसल्या बद्दल खंत व्यक्त केली त्यांनी राज्यपाल यांच्या समोर व्यक्त केली.
कुणबी समाजाच्या प्रतिनिधींनी नियोजित विधान परिषदे करिता राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मिलिंद मनोहर पाटील यांची एकमुखी शिफारस करून समाजास न्याय देण्याची आग्रही मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. भेटी दरम्यान कुणबी समाजोन्नती संघ (स्थापना १९२०),सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी हितवर्धक मंडळ (स्थापना १९१४ ),सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी परस्पर सहाय्यक मंडळ ( स्थापना १९२३),सूर्यवंशी क्षत्रिय विद्यार्थी संघ ( स्थापना १९४०) व रायगड तसेच रत्नागिरीतील बहुजन विकास आघाडी या संस्थांंन कडून मिलिंद पाटील यांच्या नावाची शिफारस करणारी पत्रे सादर करण्यात आली आहेत. राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान समाजाचे प्रतिनिधी गंगाराम घरत, सुरेंद्र अण्णा पाटील, संतोष पावडे, जयंत पाटील, संजीव पाटील व मिलिंद पाटील उपस्थित होते.
◾ मराठा आंदोलनातील सर्व मागण्यान पुढे सरकार मान झुकवत असल्याचे दिसून येत आहे. अगदी एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हि मराठा समाजाच्या दबावामुळे घेतला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. बारा बलुतेदार मध्ये ६५ ते ७० % असलेल्या कुणबी समाजाचे संपूर्ण कोकणात दोन कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. कुणबी समाजाच्या सर्व मातब्बर संस्था संघटनांनी मागणी केलेली असल्यामुळे कुणबी नेतृत्वाची घोषणा करावी.
— मिलिंद मनोहर पाटील