◾ बोईसर मध्ये नागरी वसाहतीत कचऱ्यांचे ढिग; घाणेरड्या वासांने रहिवासी हैराण
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: एकिकडे करोनाचे संकट बोईसर भागात वाढले असताना दुसरीकडे मात्र बोईसरच्या स्वच्छतेचे तिनतेरा झाले आहेत. येथील रहिवासी वस्तीत घराची खिडकी उघडताच उग्र दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही भागात आठवडाभर कचरा उचलला जात नसून ग्रामपंचायतीने स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीत रोज मोठ्या प्रमाणात घनकचरा रस्त्यावर पडलेला अवस्थेत दिसून येतो ग्रामपंचायती कडून सकाळी व रात्रीच्या वेळी घनकचरा उचलला जात असला तरी काही भागात आठवडाभर कचरा तसाच कुजलेल्या अवस्थेत पडून राहतो. यातच येथील डिजय नगर भागातील मेमन काँलनी याठिकाणी इमारतीच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडीत कचरा साठवून राहत असल्याने त्यांची उग्र दुर्गंधी याभागात येत आहे. सकाळच्या वेळी मोकळ्या हवेसाठी खिडकी खोलल्या नंतर घाणेरड्या वासांने दिवसाची सुरुवात नागरिकांना करावी लागत आहे. यातच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने हा कचरा आजूबाजूला पसरला असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील समोर आला आहे.
बोईसर ग्रामपंचायत अंतर्गत कचराकुंडीत असलेला घनकचरा उचलण्यासाठी 65 कर्मचारी काम करत असुन साधारणपणे महिन्याला 10 लाख रूपये खर्च केला जात आहे. कचरा उचलण्यासाठी असलेल्या वाहनांना सुमारे एक लाख रूपयाचे इंधनावर खर्च केला. यातच वाहनांच्या दुरूस्ती वर देखील हजारोचा खर्च होत असला तरी देखील बोईसर स्वच्छ दिसत नाही. याअगोदर असलेल्या विरोधकांनी याबाबत सुरूवातीला एकच रान उठवले होते लाखो रूपयाच्या खर्चावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र कालांतराने बोईसर ग्रामपंचायत मधील सत्ताधारी व विरोधकांचे सुत जुळून आल्यानंतर गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारची विरोधकांची तक्रार समोर आलेली नाही. बोईसर ग्रामपंचायत लाखोचा खर्च कचऱ्यांवर होत असताना देखील बोईसरचे उकिरडे मात्र आजवर स्वच्छ झालेले नाही.
◾कचरा उचलणारी दोन वाहने बंद असल्याने त्यांची दुरूस्ती सुरू आहे. करोनामुळे काही कर्मचारी कॉरंटाईन असल्याने कर्मचारी संख्या कमी आहे. डिजय नगर मेमन काँलनी मध्ये साचलेला कचरा रात्रीच्या वेळी उचलण्यात येईल.
— कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी बोईसर
◾ मेमन काँलनी भागात आमच्या इमारती खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतानादेखील ग्रामपंचायती कडून कचरा उचलला जात नाही. आठवडा उलटून जात असताना देखील कचरा उचलण्यासाठी कोणीही फिरकत नाही. सकाळी घराची खिडकी उघडताच घाणेरडा दुर्गंध येत असतो.
— श्रद्धा दिवेकर, स्थानिक रहिवासी