■ तिरस्कार वाटणारा सेक्युलर शब्द स्वीकारला का? -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: रेस्टोरंट, बार व बीचेस सूरु करण्यात आले मात्र अद्याप पर्यंत राज्यातील मंदिरांना कुलूप असल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? असे देखील राज्यपालांनी या पत्रात लिहिले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता. या संवादात मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुनश्च हरिओम अशी घोषणा केली होती. त्याच बरोबर लॉकडाऊन शब्द काचऱ्याच्या डब्यात टाकण्याची घोषणा देखील केली होती. मात्र लॉकडाऊन पूर्णतः संपुष्टात आले नसून मंदिरांना अद्यापही कुलूप असल्याने मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी खरमरीत पत्र लिहिले. हे पत्र सेनेच्या हिंदुत्वावर चिमटा काढणारे आहे. तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभु श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपणे व्यक्त केली. त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरालाही भेट दिली. मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत? की, ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो सेक्युलर शब्द तुम्ही स्वीकारला आहे? असे राज्यपालांनी पत्रात लिहिले.
गेल्या तीन महिन्यांपासून मंदिर सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्ठमंडळ भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश होता. असे राज्यपालांनी पत्रात लिहिले. त्याच बरोबर विनंती करतो की, कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावी. असे देखील पत्रात लिहिले आहे.
■ राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
◆जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठविणे हे देखील अयोग्यच.
◆आपण माझा हिंदुत्वाचा जो उल्लेख केला तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
◆ज्या सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता तो सेक्युलर शब्द स्वीकारला का? असा प्रश्न आपल्याला का पडावा. केवळ धर्मस्थळे उघणे म्हणजे हिंदुत्त्व आणि नउघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणने आहे का? मग आपण राज्यपाल पदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतली त्या घटनेचा महत्वाचा गाभा सेक्युरिझम आहे तो आपल्यला मान्य नाही का?
◆ गेल्या ३ महिन्यात काही शिष्ठमंडळींनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील ३ पत्रे आपण जोडली आहेत ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व समर्थकांची आहेत. आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे सांगितले.