◾लुटारू टोळीमुळे नागरिक त्रस्त; पोलोसांनी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी.
पालघर दर्पण : वार्ताहर
नालासोपारा: वसई तालुक्यात लॉकडाऊन लागल्या पासून गर्दुल्यांची टोळी अधिकच फोफावत असल्याने दिसत आहे. यामुळे लहान मुले रुपयासाठी मागे लागणे, हाथ पडून ठेवेन असे प्रकारांना दररोज नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यातच आता गर्दुल्ल्यांची लुटारू टोळी देखील सक्रिय झाली असल्याचे समोर येत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांना लुटण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक सहज लुटले जात असल्याच्या घटना गेल्या १० ते १५ दिवसात वारंवार घडल्या आहेत. सिग्नलवर तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दुल्यांची ही टोळी मोठ्या प्रमाणावर आढळते. लहान मुले असल्याने नागरिक दयेने किंवा भावनिक होऊन पैसे देण्यास तयार होतात. मात्र त्याच वेळी लहानमुले नागरिकांची नजर चुकवून वस्तूंवर हात साफ करत असल्याचे समोर आले आहे. अशा अनेक घटना वसई नालासोपऱ्यात घडू लागल्या आहेत. त्यामुळे गर्दुल्ल्यांवर योग्य ती कारवाई होण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
नालासोपऱ्यातील पाटणकर पार्क, तुळींज, चंदन नाका, वसईतील आंबडी रोड सिग्नलजवल अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. प्रामुख्याने लहान मुले या टोळीत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. काही दिवसांपूर्वीच नालासोपारा पश्चिमेला ऐका महापालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रकार घडला असल्याचे समोर आले. सदर कर्मचारी रस्त्यावर उभे असताना “मी नगरसेवक आहे मला बघून तू गाडी थांबवली नाहीस” अशी दमदाटी एक इसमाने त्यांना केली. त्याच वेळी सदर इसमाचे दोन साथीदार आले .त्यांनी कर्मचाऱ्याच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीची चावी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचाऱ्याने पळ काढला. अशा घटनांमुळे वसई तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक या लुटारू टोळीणपासून सावध राहत असल्याचे दिसत आहेत. त्याच बरोबर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
■ अशी केली जाते चोरी
प्रामुख्याने सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी गर्दुल्यांची लुटारू टोळी फिरताना दिसते. एखादी दुचाकी किंवा चारचाकी थांबली असता. त्या गाडीच्या काचांवर हाथ मारून त्याला खिडकीच्या काचा खाली करण्यास भाग पाडतात. गर्दुल्ले भिक मागण्याच्या हेतूने आले आहे असा समज वाहनचालकाचा असतो. मात्र भिक मागण्याच्या बहाण्याने चलाखीने खिशातील, पाकिटातील, पिशवीतील, सीटवरील, मोबाईल, रोख रक्कम, बॅग बेमालूमपणे लंपास करून नेतात. अशा प्रकारे ते गुन्हा घडवून आणतात. त्याच बरोबर वसईत फिरणाऱ्या गर्दुल्ल्याजवळ आधारकार्ड तसेच कोणतेही ओळखपत्र नसल्याचे अनेकदा समोर आले.