◾सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचा प्रदुषण मंडळाचा दिखावा; कारखानदाराच्या दबावामुळे 24 तासातच रविवारच्या दिवशी ईमेल द्वारे प्रकल्प सुरू करण्याचे आदेश
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याचे दिलेले आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने 24 तासात मागे घेतले आहेत. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात रासायनिक सांडपाण्यावर पुर्णपणे प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याचा ठपका ठेवत प्रकल्प बंद करण्याचे आदेश शनिवारी दुपारी सर्व विभागांना प्राप्त झाले. मात्र सांडपाणी प्रकल्प बंद झाल्यास शेकडो प्रदुषणकारी कारखाने बंद होणार असल्याने कारखानदारांच्या दबावामुळे नागरीकांच्या जिवावर उठलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
तारापुर येथील रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी हे प्रक्रिया करण्यासाठी तारापुर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटी प्लाँट नं. एएम 29 येथे शुध्दीकरण करण्यासाठी आणले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या परवानगी नुसार रासायनिक सांडपाण्यावर पुर्णपणे प्रक्रिया करून पाणी समुद्र सोडणे बंधनकारक आहे. मात्र खर्चिक प्रक्रिया व प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्रात येत असल्याने निम्म्या हुन अधिक रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच समुद्र सोडले जात होते. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने अनेकदा सुचना करून सुध्दा याकडे दुर्लक्ष तारापुर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटीने केल्याने प्रदुषणकारी सांडपाणी प्रक्रिया क्रेद्राला बंद करण्याचे आदेश 6 मार्च रोजी दिले होते. मात्र संबंधित विभागांना विज व पाणीपुरवठा बंद करण्यासाठी त्यांची प्रत शनिवारी 7 मार्च रोजी पोचली होती.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा पाणीपुरवठा व महाराष्ट्र विद्युत विजवितरण मंडळाला तातडीने विज पुरवठा बंद करण्याचे म्हटले होते. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राप्त झालेल्या आदेशानुसार तातडीने पाणीपुरवठा शनिवारी सायंकाळी उशिरा बंद केला होता. मात्र विद्युत मंडळाने विज पुरवठा खंडित केला नव्हता. धक्कादायक म्हणजे रविवारी सुट्टीचा दिवस असताना देखील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी ईमेलद्वारे सकाळी 9:57 वाजता पुढील आदेश येईपर्यंत सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा विजपुरवठा सुरू करण्याचे आदेश दोन ओळीच्या मेलने दिले आहेत. यामुळे प्रकल्प बंद होण्यापूर्वी पुन्हा प्रदुषण करण्यासाठी सुरूच राहणार आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया केंद्राला बंद करण्याचे आदेश देण्यापूर्वीच प्रदुषणकारी कारखान्यांना देखील उत्पादन बंद करण्याचे आदेश देणे गरजेचे होते. तसे केले नसल्याने प्रकल्प जरी बंद झाला असता तरी कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी हे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रात येवून थेट आजुबाजुच्या परिसरात गेले असते. यातच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याच्या आदेशामुळे औद्योगिक क्षेत्रातील 800 कारखान्यांचे उत्पादन बंद होणार होते. यामुळे प्रदुषणाला पाठीशी घालणाऱ्या उद्योजकांच्या संस्थांना राजकीय दबाव महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळावर आणल्याची चर्चा तारापुर मध्ये सुरू आहे. तारापुर देशात प्रदुषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असला तरी येथील गावकरी मेला तरी चालेल पण उद्योजक जगला पाहिजे अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे.
◼राष्ट्रीय हरित लवादाने याअगोदर तारापुर येथील प्रदुषण करणाऱ्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्राला 10 कोटी रूपयाचा दंड ठोठावला होता. तरी देखील सांडपाणी प्रक्रिया क्रेद्रांच्या बेजबाबदार व्यवस्थापकांनी याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामकाजात कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही. तारापुर येथील सामुहिक सांडपाणी क्रेंद्राची क्षमता ही 25 एमएलडी असुन याठिकाणी कारखान्यांचे सुमारे 40 एमएलडी रासायनिक सांडपाणी प्रतिदिनी प्रक्रिया करण्यासाठी येते यामुळे उर्वरित 20 एमएलडी सांडपाणी पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसुन ते थेट नाल्यात सोडले जाते. यातच महत्त्वाचे म्हणजे जेवढ्या क्षमतेचा प्रकल्प आहे तेवढे 25 एमएलडी रासायनिक सांडपाण्यावर देखील योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही.