◾ मुसळधार पावसाने विक्रमगड तालुक्याल भातशेती उध्वस्त
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: भातपिक येन कापणीच्या तोंडावर आले असताना बुधवारी संध्याकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून तालुक्यातील भातपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच बसत आला आहे. मागील वार्षिसुद्धा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. या वर्षी भातपिक चांगले बहरले होते. मागील वर्षीची झालेली तूट या वर्षी भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र या आशेवर अवकाळी आलेल्या पावसाने पाणी फिरवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात कापून शेतात वळत ठेवलेले होते. मात्र या पावसाने ही कापलेली भाताची कणसे पूर्णपणे भिजवून पाण्यावर तरंगवली आहेत. तर उभे भातपिक देखील जमिनोदोस्त झाले आहे.
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी युवा प्रहार ग्रुपने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.