पालघर दर्पण : शिवानी रेवरे
बोईसर: नागरीकांच्या सोईसाठी शासनाने अनलाँक केले असले तरी अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून येतो. यातच देशावर अद्यापही करोनाचे सावट असून सोशल डिस्टंसिंग पाळणे हे अत्यावश्यक असताना देखील दुकानदारांन कडून नियम पायदळी तुडवले जातात. असाच प्रकार बोईसर शहरात दिसून येत असून याठिकाणी असलेल्या बाजारपेठेत दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते.
बोईसर मार्केट येथील यशपद्म या इमारतीत आम आदमी बाजार या दुकाना समोर शनिवारी सकाळी ११:२० वाजता ग्राहकांनी गर्दी केली होती. दुकानात असलेले सर्व सामान ९९ रुपयाला मिळत असल्याने वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खरेदी करताना येथील उपस्थितांना सोशल डिस्टंसिंगचे भान राहिले नव्हते. याच बरोबर गर्दीत जमलेल्या काही नागरिकांनी मास्कचा देखील वापर केला नव्हता. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस बळावत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती बोईसर भाजी मार्केट मध्ये देखील पाहायला मिळाली असून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.