◾विक्रमगडच्या राजकीय ठेकेदारांनो हातोबा देवस्थान तरी सोडायचे; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: विक्रमगड तालुका म्हटलं की भ्रष्टाचार हा प्रश्न समोर येतोच याठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे पुर्ण नसतानाच पैसे लाटण्याचे काम अनेकदा उघड झाले आहे. असाच प्रकार पुन्हा घडला असून याठिकाणी असलेल्या हातोबा या प्रसिद्ध देवस्थानाला एक कोटी रुपये खर्चून विविध प्रकारची कामे पर्यटकांच्या सोईसाठी मंजूर करण्यात आली मात्र यातील अनेक कामे आजही अपूर्ण नसताना देखील ठेकेदाराला देय देण्यात आली आहेत. यामुळे नवसाला पावणारा अशी भक्तांची भावना असलेला हातोबा बांधकाम विभागाच्या मदतीने ठेकेदारांना पावला आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
तालुक्यातील हातोबा देवस्थान परिसरात 2018-19 मध्ये पेव्हर ब्लॉक मारणे, काँक्रीट रस्ता, नदीकाठी घाट बांधून सुशोभीकरण करणे सोबत मलवाडा येथील शनी मंदिर परिसरात मंडप व पेव्हरब्लॉक लावणे तसेच कावळे येथील शिव मंदिरात सुशोभीकरण करणे अशा पाच कामांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर करून कामाला सुरुवात केली होती. मुदत संपून हातोबा येथे किरकोळ पेव्हरब्लॉक लावून घाटाच्या ऐवजी केवळ 3 ते 4 पायऱ्या बांधून अंदाजपत्रकातील कामांना पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे. शनी मंदिर परिसर तर कामासाठी व्याकुळ आहे. तर कावळे येथेही अंदाजपत्रकाच्या दर्जानुसार काम केले नसल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
सुशोभीकरणाची कामे अपूर्ण असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 70 लाख रुपये ठेकेदारांना अदा केल्याचे समोर आले आहे. मुळात कामे पुर्ण नसताना देखील एवढी मोठी रक्कम कशी अदा केली यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कुठल्याही प्रकारचे उत्तर नसल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
सुशोभीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने विवेक पवार कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काम करण्यासाठी तीन स्थानिक ठेकेदारांनी काम केलेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात एक ठेकेदार पालघर जिल्हापरिषद सदस्य असल्याची माहिती समोर आल्याने बांधकाम विभाग कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
◾ सुशोभीकरणाचे मुख्य ठेकेदाराला कडून काम करणारा स्थानिक ठेकेदार हा जिल्हा परिषदेचा सदस्य असलेला इसम पालघर जिल्ह्यातील समाजसेवक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या एका संघटनेचा जवळचा कार्यकर्ता असून त्यांच्याच कडून असे भ्रष्टाचार होत असतील तर सर्वसामान्य माणसांनी अशा बोगस ठेकेदारांविरुद्ध न्याय मागायचा कोणाकडे हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी युवा प्रहार सामाजिक संस्थे कडून करण्यात आली आहे.
◾ याबाबत ठेकेदाराला वारंवार लेखी समज देण्यात आली असून ठेकेदार यावर्षी काम पूर्ण करतील असे आश्वासन आम्हाला दिले आहे त्यानुसार लवकरच अपूर्ण काम पूर्ण करण्यास सुरुवात होईल.
— दिलीप खिसमतराव, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग विक्रमगड