◾ सरावरी संजय नगर येथील सरकारी जागेवर ग्रामीण रुग्णालय उभारणी साठी जागेची पाहणी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: मोडकळीस आलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. यातच आता सरावली संजय नगर येथील भुमाफियांचा डोळा असलेली दोन एकर सरकारी जागेवर रुग्णालय उभारणीसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. यामुळे आता बोईसरकरांचा ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा होण्याच्या वाटेवर आहे.
बोईसर ग्रामीण रुग्णालयाची तात्पुरती असलेली जुनी लाकडी इमारत मोडकळीस आली असून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला बांधकाम विभागाकडून देण्यात आला होता. बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूर असून देखील जागेचा तिढा कायम असल्याने हे रुग्णालय नेमके केव्हा उभारणी होईल याबाबत सडेतोड वृत्त पालघर दर्पणने 5 आँक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तात सरावली संजय नगर येथील सरकारी जागा उपलब्ध असताना या जागेवर रुग्णालय उभे करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. वृत्ताची दखल घेत बोईसरचे आमदार राजेश पाटील व पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित शल्य चिकीत्सक डॉ.अनिल थोरात यांनी संजयनगर येथील सरकारी जागेची पाहणी करून या जागेवर रुग्णालय उभारण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी रुग्णालयाच्या उभारणी बाबतची जागे संदर्भात सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करण्यासाठी सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
सरावली महसूल क्षेत्रात असलेल्या संजयनगर येथील दोन एकर सरकारी जागा सद्यस्थितीत मोकळी असून याठिकाणी एका भुमाफियांने काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. सरावली ग्रामपंचायत सदस्य असलेला एक भुमाफियां याठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्यावर घरपट्टी देखील लावु घेतली होती. स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्या मुळे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई देखील झाली नव्हती. मात्र आता सरकारी जागेवर रुग्णालय उभे राहण्या बाबतची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भुमाफियांच्या घशात जाणारी जागा वाचणार आहे. यातच ही जागा बोईसर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने याठिकाणी रुग्णालय उभे राहिल्यास नागरिकांना देखील सोईस्कर होणार आहे.