◾ दीपक मोहिते
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी,हा विषय,विरोधी पक्षनेत्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करावा, हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे दुर्देवच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाबाबत राजकीय नेत्यांमध्ये किती असंवेदनशीलता आहे, हे या घटनेवरून दिसून आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार,हे तिघे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेतीच्या बांधावर पोहोचले. त्यामुळे खडबडून जागे झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारहून प्रयाण करत थेट पवारांचे बारामती गाठले व तेथून त्यांनी आपला पाहणी दौरा सुरू केला. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.केंद्राकडे मदत मागण्यापूर्वी राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला दिला. पण गेल्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या प्रत्येक हल्ल्याला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यावेळीही विरोधी पक्ष नेत्यांना मार्मिक शब्दात बऱ्यापैकी कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, केंद्रसरकारने राज्याची देणी वेळेवर दिली असती तर त्यांच्याकडे हात पसरण्याची पाळी राज्यांवर आली नसती. या प्रश्नी कोणाला राजकारण करायचे आहे,त्यांना ते करू द्या,आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
आज राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राजकीय नेत्यांमध्ये जो कलगीतुरा रंगतोय,यावरून राजकारणाची पातळी किती खालावली आहे,हेच दिसून येते. राज्याच्या अनेक गावांत शेतीची प्रचंड हानी झाली असताना विरोधी पक्षनेत्याना केवळ बारामती दिसावी, यासारखे दुसरे नवल नसावे..”उंदीर जातो जीवानिशी, आणि मांजराचा मात्र खेळ होतो,” सध्या शेतकऱ्यांची अवस्था उंदरासारखी झाली आहे.. वास्तविक अशा अस्मानी संकटाच्या वेळी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे व संयुक्तरीत्या केंद्रसरकारकडून अर्थसहाय्य पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.केंद्रात भाजपचे सरकार असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रमुख भूमिका पार पाडायला हवी होती, ते न करता त्यांनी राजकीय खेळी करणे, हे न्यायाला धरून नाही.