हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
१. तिथी : आश्विन शुद्ध दशमी
२. व्युत्पत्ती आणि अर्थ : दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.
३. समानार्थी शब्द
अ. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.
आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’
४. इतिहास
अ. ‘रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.’
आ. ‘प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.
इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.
ई. दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.
उ. हा सण एक कृषीविषयक लोकोत्सव म्हणूनही साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.
५. महत्त्व : हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.
६. सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
अ. सीमोल्लंघन : अपराण्हकाली (तिसर्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.
आ. शमीपूजन : पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.
शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका । धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।
करिष्यमाणयात्रायां यथाकाल सुखं मया । तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।
अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.
इ. आपट्याचे पूजन : आपट्याची पूजा करतांना असल्यास पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण । इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.
१. आपट्याची पाने सोने म्हणून देणे : शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.
२. अपराजितापूजन : ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला । अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.
उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन : या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणिशस्त्रांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
उ १. राजविधान : दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.
७. लौकिक प्रथा : काही घराण्यांतील नवरात्रींचे विसर्जन नवमीच्या दिवशी, तर काहींचेर दशमीच्या दिवशी करतात.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण,धार्मिक उत्सव आणि व्रते’
संपर्क : 9920015949