◾तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार; यंत्रणांनी समन्वयातून परिणामकारक कामगिरी करण्याचे दादा भुसे यांचे निर्देश
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: राज्यात सत्ता कोणत्याही पक्षांची असली तरी पर्यावरण मंत्री कधीच तारापूरच्या प्रदूषणाकडे लक्ष दिलेले आजवर दिसून आले नाही. या सरकार मधील मंत्री देखील आजवर तारापूर मध्ये फिरकले नसले तरी आता पालघरच्या पालकमंत्र्यांनी तारापूरच्या प्रदूषणाकडे लक्ष देत प्रदूषण व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मंत्रालयात मंगळवारी बैठक पार पडली. यामुळे आता तरी प्रदूषणावर काही लगाम बसेल का याकडे तारापूर वासीयांचे लक्ष लागले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाने संपूर्ण परिसर काळवंडून गेला आहे. याठिकाणी प्रदूषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढत चालला असताना देखील पर्यावरण विभागाकडून नवनवीन प्रदूषणकारी कारखान्यांना परवानगी दिली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण व वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत आता पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळ, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांन समवेत मंत्रालय बैठक मंगळवारी सकाळी आयोजित केली होती.
पालघर जिल्ह्यातील वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या संदर्भात आढावा बैठकीत औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगीरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषणपातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
◾ काय म्हणाले पालकमंत्री
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी समन्वयातून ही कामगीरी करताना ते प्रत्यक्षात दिसले पाहिजे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकार्यांना यावेळी दिले. जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतांनाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरीता वृक्षारोपणानी मोहिम हाती घेण्याच्या सूचना देखील दादा भुसे यांनी केल्या आहेत.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक बड्या कारखान्यात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे ठेके असून काही ठिकाणी कितीही प्रदूषण झाले तरी आजवर सेनेच्या एकाही नेत्यांने आंदोलन किंवा कारखान्यांवर कारवाई बाबत कधीच ठोस भुमिका घेतली नाही. यामुळे आता पालकमंत्री दादा भुसे तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या प्रदूषणाकडे लक्ष देवून असल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणाबाबत तक्रार केल्यानंतर कारखानदार बँकेच्या हमी पत्रांवर पर्यावरण विभागाकडून आपले कारखाने पुन्हा सुरू करतात. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रदूषणकारी उद्योजकांवर होत नसल्याने पुन्हा प्रदूषण करण्यासाठी उद्योजक सुरूवात करतात. यातच उद्योग विभाग व पर्यावरण विभाग उद्योजकांन साठी झुकते माप देत त्यांच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने आता त्याच पक्षाचे पालकमंत्री नेमके कसा लगाम प्रदूषणावर लावतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.