■खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; जयंत पाटील
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. यावर केंदीय मंत्री रावसाहेब दावने यांनी खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत असे सांगितले होते. मात्र आज उद्या करत अखेर खडसेंना राजीनामा देण्याचा मुहूर्त मिळाला आहे. आजच एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडले असून शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर भाजप मध्ये त्यांच्यावर बराच अन्याय झाला आहे असे देखील ते म्हणाले.
मात्र यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसे यांच्या पक्षांतराचा निर्णय पक्षांपेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजप कोठेही कमी पडलेले नाही. दिल्या घरी सुखी रहा असे देखील दावने यांनी सांगितले.