पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील पाली येथे सांस्कृतिक भवनाच्या उभारणीचे काम आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत सुरू होते. मात्र हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून जैसेथे असल्याने या कामाबद्दल शंका उपस्थित करून काम तातडीने सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.
वाडा – मनोर महामार्गावर पाली येथे जुन्या तलाठी कार्यालयाची जागा घेऊन येथे 80 लाख रुपये खर्चून सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. या कामाची नेमकी मंजुरी व सुरुवात कधी झाली हे अधिकारी सांगत नसले तरी आतापर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे होते असे ते कबुल करतात.
सांस्कृतिक भवनाच्या उभारणी नंतर स्थानिकांना तसेच बचतगटाना समारंभ तसेच अन्य सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शिवाय दोन तलाठी कार्यालयांना देखील येथे जागा दिली जाणार आहे. ठेकेदाराने मात्र किरकोळ काम सुरू करून हे काम अर्धवट सोडून दिल्याने अनेक प्रश्न निर्माण होत असून करण्यात आलेले काम व त्यासाठी वापरण्यात आलेले लोखंड दिवसेंदिवस निकृष्ट होत आहे.
कोरोनाचे कारण पुढे करीत अधिकारी ठेकेदाराची जरी पाठराखण करीत असले तरी कोरोना काळात विकासकामे रखडणार नाहीत याची काळजी शासन घेत आहे मग आदिवासी विकास प्रकल्पाला कोणती अडचण आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुदत संपलेली असूनही निर्ढावलेल्या प्रशासनाने तातडीने या कामाची सुरुवात करून काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे.
◾ सचिन दुपारे नावाच्या एका ठेकेदाराने हे काम घेतले असून कोरोनाच्या कारणाने काम मार्च महिन्यापासून बंद आहे. आतापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, आपण याबाबत ठेकेदारास वारंवार सूचनाही दिल्या आहेत.
— एस. एन. पाटील, शाखा अभियंता, आ. वि. प्रकल्प जव्हार