पालघर दर्पण : शिवानी रेवरे
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात खाली आलेल्या कांद्याचे दर आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच अधिकच वाढले आहेत. दोन महिन्याआधी कांदा १० रुपये किलो ने बाजारात विकला जात होता. मात्र गेल्या २ महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढत जात असल्याचे दिसून येते. १० रुपायानंतर 25 रुपये प्रति किलोनेे कांदा विकला जात होता. मात्र गेल्या २० दिवसात ७० रुपये प्रतिकिलो पर्यंत कांद्याचे दर वाढले आहेत.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच झोडपले असून शेतकरी संकटात आले आहेत. राज्यातील बऱ्याच भागात परतीच्या पावसामुळे कांद्याचे पीक भिजले तसेच वाहून गेले असून कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवाळी नंतर बाजारात येणार कांदा पावसात भिजला असल्याने व्यापारी चांगल्या कांद्याची कमतरता असल्याचे सांगत आहेत. यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये गृहिणींचे गणित मात्र बिघडले आहे.
यंदा चक्रीवादळ व पावसामुळे तपमानात बदल झाला असल्याने साठलेला कांदा काही प्रमाणात खराब झाला. त्याच बरोबर लॉकडाऊनमुळे इतर राज्यातील व्यपाऱ्यांना कांदा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणता आला नाही त्यामुळे कांद्याची कमतरता होतीच. त्यातच आता परतीच्या पावसाने धुमाकूळ माजवल्याने ऑक्टोबरमधील कांद्याचे पीक देखील लांबणीवर गेले आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून कांदा नागरिकांना रडवणार अस म्हणण्यास हरकत नाही.