◼राजेंद्र पाटील
पालघर जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांचे वर्चस्व तुल्यबळ असून कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नाही. परंतु भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकप आदी राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेची ताकद ही तशी मोठी आहे. त्यामुळे पालघर तालुक्यात सेनेचे चांगलेच वर्चस्व आहे. परंतु नुकताच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरून उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष नेमका चालवतोय तरी कोण? असा गंभीर प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष मिळून महाआघाडीचे सरकार असल्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना मोठा पक्ष जरी असला तरी राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसावे लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सेनेकडून वैदही वाढाण यांचे नाव निवडणुकीच्या दिवशी सकाळपर्यंत शर्यतीत असताना कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक आणि अचानक पासा उलटून भारती कामडी यांना बिनविरोध अध्यक्षपद दिले जाते. म्हणजेत शिवसेनेचे पदाधिकारी हे सट्टेबाजीला बळी पडतात का? असा ही प्रश्न उद्भवत आहे.
त्याच प्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात इतर कमिटी सभापती पदांची निवडणूक पार पडली. यावेळी वैदेही वाढाण यांचे कुठेतरी नाव असेल असे वाटत होते. मात्र तसे काही घडताना दिसून आले नाही. याउलट शिवसेनेने अनुष्का ठाकरे यांना महिला व बाल कल्याण सभापती तर सुशील चुरी यांना कृषी सभापती पदी नियुक्त करून समाधान मानले. राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी यांना बांधकाम तर बहुजन विकास आघाडीचे विष्णू कडव यांना समाजकल्याण सभापती पद बिनविरोध दिले. यावरूनच लक्षात येते की सेनेच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसून त्याचा फायदा राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडी घेतल्याचे चित्र जिल्ह्यात स्पष्ट दिसून येत आहे. एका बाजूला पालघर व बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढविण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः करत असून दुसऱ्या बाजूला बोईसर विधानसभा जिंकण्याऐवजी यापुढेही सेनेच्या उमेदवाराचा पराभव कसा होईल याची उत्तम खेळी खेळली जात आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादीची युती असताना आणि बहुजन विकास आघाडी सत्ता नसताना मधेच उडी मारून पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातून अवघ्या पंधराशे मतांनी पराभूत झालेल्या विलास तरे ना प्रतिस्पर्धी तयार व्हावा. याच उद्देशाने राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीला हाताशी घेऊन खेळी केली असल्याचे स्पष्ट होते.
विलास तरे यांना राजकीय शह देण्याची पूर्वतयारी म्हणूनच बहुजन विकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव यांना समाज कल्याण सभापती निवडून देण्यात आले आहे. सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत सत्ता स्थापन केली आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसला बविआची किंवा इतर कोणत्याही पक्षाची मदत घेण्याची गरज नव्हती. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून आणि त्यांची मान्यता नसताना बविआचे जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव यांना विलास तरे यांचा उद्याचा प्रतिस्पर्धी म्हणून उतरविण्याची तयारी सट्टेबाज व गटबाज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांच्या सहकार्याने केलेली आहे. राज्य सरकार कधी पडेल याचा काही नेम नाही. अशा वेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जे आमदार निसटत्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांना सहानुभूतीपूर्वक समजून घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. तर पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या सोयीसाठी बोईसर विधानसभा मतदारसंघातील सेनेच्या उमेदवाराला निश्चितपणे पराभूत कसे करता येईल. याची पूर्वतयारी करत असल्याचे चित्र नुकताच झालेल्या कमिटी सभापती निवडणूक प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे.
पक्षप्रमुखांची मान्यता नसताना बविआच्या सदस्याला सभापती पदी निवडून दिल्याने स्पष्ट होते की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष नेमका चालवतोय तरी कोण? अशीच परिस्थिती जर पालघर जिल्ह्यात राहिल्यास शिवसेनेची ताकत कमीकमी होऊन जिल्ह्यात असलेला सेनेचा दबदबा कमी पडल्याशिवाय राहणार नाही. विलास तरेंनी बोईसर विधानसभा मतदारसंघात सेनेची बाजू सांभाळली नसती. तर सेनेला पालघर जिल्ह्यात नाक दाखवायला ही जागा उरली नसती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हितेंद्र ठाकूर यांच्या मागे फरफतट गेले असून निवडणुकीबाबत योग्यप्रकारे बोलणी करू शकले नाहीत. तर सेनेने स्वतः निवडणूक प्रक्रिया वा निवडणूक जिंकण्याची रणनीती आखू शकले नाहीत. पालघरमध्ये सेनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि पक्षाला नवी दिशा देण्यासाठी पक्षप्रमुखानी याकडे लक्ष देऊन बदल घडविणे गरजेचे आहे. तरच पक्षाला बळकटी आणि मजबुती येईल, असे अनेेक कट्टर शिवसैनिकांच्या मनात खदखदत आहे.