◾ सरावली ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत वस्तींना पाणीपुरवठा करण्यासाठी उद्योग मंत्र्यांचा पुढाकार; स्थानिक नेत्यांचा मतदान संघ अबाधित राखण्यासाठी हालचाल
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यातील सर्वांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असलेल्या सरावली मध्ये अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संरक्षण मिळत असल्याचे आजवर समोर आले आहे. मात्र आता अशाच अनधिकृत उभ्या राहिलेल्या वस्त्यांना ग्रामपंचायत कडून सुविधांची खैरात दिली जात आहे. येथील अनधिकृत वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून पक्षांचे मतदार संघ अबाधित राखण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप स्थानिकांन कडून केला जात आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीत अवधनगर, आदर्श नगर, भैया पाडा अशा अनेक भागात सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे हजारोंच्या संख्येने उभी राहिली आहेत. स्थानिक महसूल विभाग व ग्रामपंचायतीच्या पाठींब्या मुळे व त्याला मिळालेल्या राजकीय पाठबळा मुळे अनधिकृत बांधकामाचे लोण वाढले आहे. या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत सरकारी जागेवर सुमारे पाच हजार पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यातच येथील आजवर झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व राजकीय पक्षाच्या नेत्यांची चाळीची बांधकामे सर्वाधिक प्रमाणात असून त्याठिकाणी भाडेतत्त्वावर परप्रांतीय कामगारांना रूम दिल्या जातात. यातच आता अशा अनधिकृत चाळींना नळ पाणीपुरवठा व्हावा याठिकाणी एका स्थानिक नेत्यांने उद्योग मंत्री यांच्या कडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 500 चौरस मिटर जागा पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी मंजूर करून दिली आहे. मात्र गावातील इतर स्थानिक वस्त्यांना व इतर गावातील नागरिकांना कचरा व्यवस्थापन व खेळाच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी यासाठी फाईल अनेक वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडे धुळखात पडून आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या बोईसर, खैरापाडा, पाम, कोलवडे, पास्थळ व सालवड अशा अनेक गावांचा कचरा व्यवस्थापन प्रश्न गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडे जागेची मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने देखील याबाबत पत्रव्यवहार केला असून आजवर या मागणी कडे उद्योग विभागाकडून कधीही सकारात्मक विचार केला गेला नसल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. असे असले तरी अनधिकृत बांधकामे होत असलेल्या ठिकाणी सरकारी जागा भुमाफिया कब्जा करत असताना अशा अनधिकृत वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी एवढा खटाटोप का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच भागातील अनधिकृत वस्त्यांना पाणीपुरवठा गेल्या तिन चार वर्षांपासून ग्रामपंचायत चोरट्या पध्दतीने करत असल्याचे याअगोदर उघड झाले होते. परंतु पाणीचोरी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून करण्यात आली नाही. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर हे सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या इशारावर चालते का असा प्रश्न स्थानिकांंन कडून उपस्थित केला जात आहे.
◾ मतदारसंघ अबाधित राहण्यासाठी तयारी
सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अवधनगर, भैया पाडा, आदर्श नगर व ओमसाई नगर या सरकारी जागेवर उभ्या राहिलेल्या वस्त्या स्थानिक नेत्यांनी उभारल्या आहेत. याठिकाणी चाळीचे बांधकाम करून त्या बांधकामांना घरपट्टी व इतर सुविधा ग्रामपंचायत कडून उपलब्ध करून घेतले जातात. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांचे देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे याच भागात असल्याने अशा अनधिकृत बांधकामांना रस्ते, गटारे, रोड लाईट व नळ पाणीपुरवठा अशा सुविधा पुरविल्या जातात.
◾ सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याठिकाणी नागरी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने आम्ही सुविधा पुरवतो. तसेच ग्रामपंचायतीने याभागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडे मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्य यांच्या अनधिकृत बांधकामे बाबत माहिती याअगोदर जिल्हा प्रशासना कडे पाठविण्यात आली आहे.
— सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी सरावली