■मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्तांना दिलासा देणारी घोषणा.
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटी मदतीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकणात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच झोडपले आहे. यादरम्यान शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना १० हजार कोटी मदत म्हणून देण्याची घोषणा केल्या नंतर शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सणासुदीचे दिवस तरी सुखाचे येतील या आशेवर शेतकरी आहे.
दिवाळी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही असे मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपूर्वी बांधावर शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचे हे शब्द सत्यात उतरतील अशी अपेक्षा मदतीची घोषणा जाहीर केल्यानंतर नुकसानग्रस्तांच्या मनात निर्माण झाली आहे. घोषणे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिरायती व बागायत क्षेत्रासाठी १० हजार प्रति हेक्टर मदत देणार असून या १० हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरासाठी, रस्ते-पुलाचे बांधकाम तसेच पाणीपुरवठा याचा समावेश असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर केंद्रसरकरकडून राज्याचे हक्काचे ३८ हजार कोटी येणे बाकी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीनंतर सरकारकडून पहाणीकरिता पथक येतात मात्र २ ते ३ वेळ आठवण करून दिल्या नंतरही पथक आलेले नाही. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. असे देखील मुख्यमंत्र्यांनी संगीतले.