
◾वाढवण बंदरा विरोधात स्थानिक आक्रमक; सत्ताधारी पक्षांची मात्र बघ्याची भुमिका
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: विकास म्हटलं की, नागरिकांना आता भिती वाटायला लागली आहे. याचे कारण देखील तसेच असून तारापूर भागात आलेला अणुऊर्जा प्रकल्पामुळे येथील जनतेचा नेमका कोणता विकास झाला हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आता पालघर जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली येणाऱ्या प्रकल्पांना जोरदार विरोध सुरू आहे. वाढवण बंद देखील त्याला अपवाद नसून स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदरा विरोधात स्थानिकांनी पुन्हा एकदा आपली कंबर कसली आहे. मात्र राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना सह इतर पक्षांनी वाढवण विरोधात ठोस भूमिका घेतली नसल्याने स्थानिकांन मध्ये तिव्र नाराजीचा सुर आहे.
डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला 10 हुन अधिक गावाचा विरोध असला तरी या बंदारा मुळे शेकडो गावातील शेतजमिनी बाधित होणार आहेत. केंद्र सरकारने घाट घातलेल्या वाढवण बंदराला राज्य सरकारचा देखील छुपा पाठिंबा असल्याने याभागात नियमांना डावलून सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्त मध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी अनेकदा विरोध केला आहे. वाढवण बंदराविरुद्ध वरोर, वाढवण येथील गावातील जागृत महिला, तरुणी, लहान मुली यांनी नारी शक्तिचा जागर करुन गावातील पाड्यापाड्यात फिरुन बंदरा विरोध जनजागृती केली होती. विनाशकारी प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करण्यासाठी शनिवारी 24 आँक्टोबर रोजी वरोर येथील भजनी मंडळासह ग्रामस्थांनी शंखोदर या प्रसिद्ध देवस्थानासमोर भजन गाऊन साकडे घालण्यात आले होते.
बंदरा विरोधात जनजागृती केल्या नंतर वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वरोर ग्रामस्थांनी रविवारी उत्सफुर्त प्रतिसाद देत गावातून रॅली काढून पवित्र देवस्थान शंखोदर येथे जागृत देवस्थानाला साकडे घालण्यासाठी भजन गाऊन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यानंतर सरुच्या बागेत जमावाचे सभेत रुपांतर झाले. दरम्यान संघर्ष करताना प्राण गेले तरी चालतील पण वाढवण बंदराला विरोध करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवर वाढवण बंदराला जोरदार विरोध सुरू असला तरी राज्य सरकार व त्यातल्या त्यात नेहमी निवडणूकीत वाढवण विरोध तोंफ झाडणारे आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मात्र गप्प असल्याने शिवसेनेची भूमिका बंदरा विरोधात अपस्षट असल्याचे दिसून येते. आजवर शिवसेनेने वाढवण बंदरा विरोधात बोलताना स्थानिकांनी बंदराला विरोध केला तर आमचा पण विरोध असले अशी भूमिका घेत येथील अनेक निवडणूका पार पाडून घेतल्या यामुळे आता तरी स्थानिक भूमिपुत्र राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले जाणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
◾प्रभु श्रीरामाचे राजकारण करणाऱ्या पक्षांना शंखोदरचा विसर
भाजप असो की शिवसेना रामाचे नाव घेवून देशभर राजकारण करत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु वाढवण बंदरा विषयी हिंदुत्ववादी संघटना व केंद्रात सत्तेत असलेल्या हिंदुत्ववादी पक्षाला याठिकाणी असलेल्या शंखोदर या पवित्र स्थाना बाबत माहिती घेणे गरजेचे आहे. शंखोदर हे जागृत देवस्थान असुन तेथे प्रभु श्रीरामाने आपल्या पित्याचे म्हणजेच दशरथाचे पिंडदान केले होते.शिवाय श्री गुरुचरित्र मधे शंखोदर येथे शंख मिळतात कारण येथे श्री हरी विष्णूंचा वास आहे. आणि प्रभू परशुराम येथील समुद्रात गुप्त स्वरूपात वास करतात असे म्हंटले आहे. आजही धार्मिक विधीकरिता शंखोदर येथे लांबुन लोक येत असतात. मात्र याठिकाणी बंदर झाल्यास हे पवित्र स्थान नाहिसे होणार आहे.
◾ जेएनपीटी च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
वाढवण बंदर उभारण्यास न्यायालयीन बंदी असतानाही,केंद्र सरकार सर्व पर्यावरणीय कायदे आणि सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन कायदे पायदळी तुडवून,वाढवण बंदर उभारू पहात आहे या सरकारच्या अन्याय कृतीचा निषेध करण्यासाठी स्थानिक टीघरेपाडा बंदर विरोधी संघर्ष समितीने,दसऱ्या निमित्त,बंदराची उभारणी करू पहात असणाऱ्या जेएनपीटी रुपी राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मुंडेंश्वरी देवालयाच्या समोर दहन करण्यात आले,याच वेळी “एकच जिद्द वाढवण बंदर रद्द”अशा गगनभेदी घोषणा देण्यात येऊन, जेएनपीटी चा निषेध करण्यात आला.