पालघर दर्पण : सचिन भोईर
विक्रमगड: वाडा शहरातील फटाका विक्री अनेक जिल्ह्यात प्रसिद्ध असून दिवाळी दरम्यान करोडो रुपयांचे फटाके विक्री केले जातात. वाड्यातील फटाके पालघर, ठाणे, नाशिक, मुंबईसह कोकणात सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र वाड्यातील काही दुकाने अनधिकृत असून शहरासाठी धोकादायक असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहेत.
वाड्यातील सामाजिक कार्यकर्ते निलेश चव्हाण यांनी मिळविलेल्या माहितीत फटाका विक्री परवाने 31 मार्च 2020 ला संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून फटाका विक्री व क्षमतेपेक्षा अधिक भरलेली गोदामे बेकायदेशीर आहेत असा त्यांचा आरोप आहे. वाडा शहराजवळ परळीनाका व देसईनाका या भागात फटाक्यांची दुकाने असून पालघर, ठाणे, नाशिक, मुंबईसह कोकणात सर्वत्र प्रसिद्ध आहे. मलवाडा व बालीवली या गावात तर फटाक्यांची भव्य गोदामे देखील आहेत. सामाजिक कार्यकर्ते निलेश चव्हाण यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहिती नुसार दिलीप ट्रेडर्स, सिद्धिविनायक सेल्स, एजन्सी, प्रितम सेल्स एजन्सी, प्रसाद ट्रेडर्स व नंदकुमार ट्रेडर्स यांचे परवाने 31 मार्च 2020 ला संपुष्टात आले असून याबाबत कोणतेही नूतनीकरण करण्यात आलेले नाहीत.
गोदामात असलेला साठा हा देखील क्षमतेपेक्षा अधिक असून तो अनधिकृत व धोकादायक आहे असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. लॉकडाउन काळात या फटाक्यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणात फटाके दक्षिण भारतातून आले मात्र ते कुणाच्या परवानगीने आणण्यात आले याबाबतही आक्षेप घेत वाडा तालुक्यातील हा फटाका व्यवसाय पूर्णपणे अनधिकृत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
फटाक्यांची क्षमतेपेक्षा जास्त भरलेली गोदामे व नियमबाह्य दुकाने शहरात व लोकवस्ती जवळ असल्याने तसेच शहरात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने धोकादायक आहेत. शिवाय हा व्यवसाय शासनाचा करोडो रुपयांचा महसूल देखील बुडवित आहेत असा आरोप करीत तातडीने हा फटाका व्यवसाय बंद करावा अशी मागणी चव्हाण यांनी पालघर जिल्हाधिकारी यांकडे केली आहे.
◾ फटाका दुकानांबाबत चौकशी करून त्यांना नोटीस बजावली जाईल.
— उद्धव कदम, वाडा तहसीलदार
◾फटाके विकताना कोणतेही पक्के बिल दिले जात नसल्याने महसुलवर पाणी फेरले जाते, परवाना नसतांनाही जोमाने सुरू असलेल्या या व्यवसायाला कुणाचे अभय आहे हे शोधून तातडीने हा अनधिकृत व्यवसाय बंद करावा.
— निलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते
◾दुकानांचे परवाने 31 मार्च ला संपले तरी आम्ही त्यापूर्वीच नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत मात्र कोरोनामुळे बहुधा नूतनीकरण रखडले असेल, आमचा व्यवसाय अनधिकृत नसून उलट या व्यवसायाने अनेकांना रोजगार निर्मिती मिळत आहे. आमच्यावर केले जाणारे आरोप निरर्थक असून आम्ही शासनाला नियमित करोडो रुपयांचा टॅक्स अदा करतो.
— प्रितम भोपतराव, फटाका विक्रेता, वाडा