◾ नागझरी भागातील खदान माफियांना महसूल विभागाची साथ; स्वामित्वधन परवाना असतो दुसराच उत्खनन होते भलत्याच ठिकाणी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: सरकारी व आदिवासी जागेवर खदान माफियांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू केले असून बोईसर पुर्वेकडील डोंगर टेकड्या देखील भुईसपाट करण सुरू आहे. पर्यावरणाची हानी होत असली तरी जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार केला जात आहे. यातच परवानगी नसलेल्या बेकायदेशीर खदानींना इतर खदानींचा स्वामित्वधन परवाना दाखवून बेसुमार वाहतूक नागझरी भागात सुरू आहे. मात्र तरीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
बोईसर पुर्वेला नागझरी, लालोंडे, गुंदले, किराट, निहे या संपूर्ण भागात बेसुमार दगड खदानीचे खोदकाम सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या असताना देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. महसूल विभागाच्या नियमानुसार याभागातील एकही खदान सुरू नसून अनेक खदानी प्रमाणापेक्षा अधिक खोलवर गेल्या असल्याने आजूबाजूला असलेल्या गावातील विहरींचे पाणी व कुपनलिका देखील उन्हात कोरड्या होतात. परंतु याची कोणत्याही प्रकारची फिकीर जिल्हा प्रशासनाला नसल्याने याठिकाणी नियमबाह्य पणे बेकायदेशीर खदानींना स्वामित्वधन परवाने दिले जातात. नागझरी येथील सर्वे नंतर 150 या शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जागेवर बेसुमार खदानी खोदून शेतजमीन गायब झाल्या आहेत. याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर खदानींना इतर सर्वे नंबर वरील खदानींचा स्वामित्वधन परवाना वापरला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र तरीही महसूल विभागाने येथील स्वामित्वधन परवाने रद्द देखील केले नसल्याने महसूल विभाग व खदान माफियांच्या संगणमताने बेकायदेशीर खोदकाम सुरू असल्राचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पालघर महसूल विभागाकडून दोन वर्षांपूर्वी बोईसर पुर्वेकडील सर्वे खदानींचे मोजमाप करण्यात आले होते. यामध्ये खदान माफियांना कोट्यवधी रुपयांचा दंड होणार अशी बतावणी महसूल विभागाकडून केली जात होती. त्यावेळी असलेल्या तहसीलदार यांनी वेळ मारून नेत कोणत्याही प्रकारची कारवाई आपला कार्यकाळ संपेपर्यंत केलेली नाही. येथील महसूल विभागाच्या आर्शिवादाने सुरू असलेल्या बेकायदेशीर खदानी व त्याकडे महसूल विभागाने केलेले दुर्लक्ष याबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध झाल्या नंतर याभागात खदानींची तपासणी करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे येथील बहुतांश खदानींची खोली प्रमाणापेक्षा अधिक गेली असल्याने अशा खदानींना स्वामित्वधनाचा परवाना नियमानुसार देता येत नाही. परंतु तहसीलदार पालघर यांच्या कडून खदानींचे मोजमाप न करताच व खोदकाम झालेल्या जागेचा पंचनामा न करताच नियमांना बगल देत आजवर परवाने देण्यात आल्याचे दिसून येते. यामुळे याभागातील आजवर देण्यात आलेल्या बेकायदेशीर परवान्यांची तपासणी करून महसूल अधिकारी व खदान माफियांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडून केली जात आहे.
◾ नागझरी भागात शासनाने वाटप केलेल्या नवीन शर्तीच्या जागेवर खदानमाफियांनी बेसुमार खोदकाम केले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप केलेली जागा दुसरी असल्याचा भास महसूल विभागाकडून व खदान माफियांन कडून दाखवला जात आहे. मात्र सद्यस्थितीत जरी शेतकऱ्यांना सातबारा दिलेल्या जागेचे सिमांकन करण्यात आले नसले तरी अशा जागेवर बेकायदेशीर करण्यात आलेल्या खोदकामाकडे स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजवर दुर्लक्ष का केले असा सवाल तक्रारदार यांच्या कडून उपस्थित केला जात आहे.
◾ नागझरी, लालोंडे, गुंदले, किराट, निहे या संपूर्ण भागात 50 टक्के हुन अधिक नियबाह्य खदानी आदिवासी जागेवर व महसूल विभागाच्या जागेवर सुरू आहेत. बेकायदेशीर खदानींना स्वामित्वधन वाहतूक परवाना मिळत नसल्याने इतर खदानींच्या परवान्या वरती उत्खनन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने सुरू असतो. यातच येथील काही आदिवासी जागेवर सुरू असलेल्या नियबाह्य खदानींना देखील बेकायदेशीर पणे स्वामित्वधनाचे परवाने दिले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
◾ खदानींना दिलेल्या राँयल्ट्या याबाबत तपासणी करण्यासाठी पालघर तहसीलदार यांना सांगण्यात आले आहे. बेकायदेशीर सुरू असलेल्या खदानी बाबत चौकशी तहसीलदार यांच्या कडून सुरू असून यामध्ये दोषी आढळून येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच स्थानिक तलाठी यांचा पंचनामा असल्या शिवाय कोणत्याही प्रकारची राँयल्टी देण्यात येणार नाही.
— धनाजी तोरसकर, उपविभागीय अधिकारी(प्रांत अधिकारी) पालघर